सोलापूर अंनिस च्या जटानिर्मुलन मोहिमेस प्रतिसाद
सोलापूर : ईगल आय मीडिया
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखेने महिलांच्या जटानिर्मुलनासाठी एक मोहिम सुरु केली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वस्ती पातळीवरील कार्यकर्ते आता यासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे गेल्या वीस दिवसात चौथ्या महिलेस जटामुक्त करण्यात सोलापूर ‘अंनिस’ला यश मिळाले आहे.
हैद्राबाद रोड, विडी घरकुल येथील सौ. तारामती महादेव कलशेट्टी ( वय 66 ) यांनी गेल्या 35 वर्षांपासून जटा वाढविल्या होत्या, पण 5 – 6 वर्षांपासून याचा त्यांना जीवघेणा त्रास होत होता. मान दुखी, डोके दुखी, डोक्यात सारखी खाज यामुळे चिडचिड व झोप निट होत नव्हती असे पती महादेव कलशेट्टी म्हणाले.
मग त्यांनी आपले मित्र व विडी घरकुल मधील सामाजिक कार्यकर्ते अंबादास गट्टी यांना ही व्यथा सांगितली, दोघांनी चर्चा करुन अंनिसशी संपर्क साधला. अंनिस राज्य समिती सदस्या निशा भोसले, कार्याध्यक्ष व्हि. डी. गायकवाड, अॅड. सरिता मोकाशी, लता ढेरे व अंजली नानल यांनी जटानिर्मुलन केले. त्यांचे पती श्री. महादेव कलशेट्टी यानी अंनिस चे आभार मानले.
गरीब लोक अंधश्रध्देपोटी व जटा काढण्यास खुप खर्च येतो, म्हणून त्रास सहन करतात, अशा लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.