पंतांच्या नेतृत्वाखालील एस. टी.च्या प्रवासाची स्टोरी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सहकारातील डॉक्टर आणि राजकारणातील संत असे ज्यांना म्हटलं जातं ते सुधाकरपंत परिचारक राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे 9 वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी संकटातून बाहेर काढून उभा केलेल्या संस्थापैकी st महामंडळ एक आहे. आपण मालकांनी st ला कशा पद्धतीने सावरले याचा आढावा या लेखातून आणि यु ट्यूब चॅनेलवरील व्हीडिओ तून घेऊयात, व्हीडिओ शेवट पर्यंत पहा.
बहुतांश मराठी माणसांनी आयुष्यात पहिला प्रवास st बसने केला आहे. सर्वांना आठवत असेल ती st बस, एका बाजूला 3 सीट्स आणि एका बाजूला 2 असे एका ओळीत 5 प्रवाश्यांना बसण्याची सोय होती. सुरुवातीला st शिवाय पर्याय नव्हता म्हणून लोक याच बसमधून प्रवास करायचे. कोंबड्याची वाहतूक जशी करतात ना तशीच आपली वाहतूक या st नावाच्या लाल डब्यातून व्हायची. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक खाजगी प्रवासी वाहतुकीकडे वळले. आणि st चे प्रवासी संख्येने कमी होऊ लागले. हे लक्ष्यात घेऊन मालकांनी st बस मध्ये आमूलाग्र बदल केले, लाल डबा वाटणारी st बस आरामदायी झाली. ती मालकांच्या संकल्पनेतूनच. सुधाकरपंत परिचारक st महामंडळाचे अध्यक्ष झाले.तेंव्हा st महामंडळ 959 कोटी रुपये तोट्यात होते. त्यामुळे st ला उभारी देण्यासाठी दुरावलेले प्रवासी st कडे वळवणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी विविध उपाय योजना हाती घेतल्या.
त्यांच्याच काळात हात दाखवा, st थांबवा हे अभियान आले. तत्पूर्वी केवळ अधिकृत बस थांब्यावर थांबणारी st ग्रामीण भागात एकट्या- दुकट्यासाठी हात दाखवेल तिथे थांबू लागली. St चे चालक, आणि वाहक म्हणजेच कंडक्टर प्रवाशांशी सौजन्याने वागत नाहीत या तक्रारी आल्यानंतर st कर्मचाऱ्यांसाठी सौजन्य सप्ताह लागू केला. ST च्या बसेस सतत नादुरुस्त होतात, त्यामुळे देखभाल खर्च वाढतो, जुन्या बसेस इंधन खूप खातात त्यामुळे डिझेल खर्च वाढतो हे लक्षात येताच मालकांनी राजकीय वजन वापरून 4 हजार नवीन st बसेस महामंडळाच्या ताफ्यात भरती करून घेतल्या.
राज्यात मोठ्या शहरात मोक्याच्या जागी st महामंडळाच्या जागा आहेत, त्या पडून आहेत, जुनी बस स्थानके प्रवास्यांसाठी गैरसोयीची होत आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्या जागा विकसित करण्याचा निर्णय मालकांनी घेतला. खाजगी विकासकांकडून ही बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केली. राज्यातील अनेक बसस्थानकाचा चेहरा – मोहरा यातूनच बदलला.
St चे प्रवासी वाढवा अभियान ही यशस्वी ठरलेली संकल्पना मालकांचीच. राज्यातील 4 दिवस, 6 दिवस प्रवासी पास काढून वाटेल तिथे फिरा ही योजना मालकांच्याच काळातील. तिर्थक्षेत्र प्रवास बस ही संकल्पना पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर अशी सुरुवात मालकांच्याच काळातील. St बसेसला अलीकडे आपण लाल परी म्हणतो, यातून तिचा सन्मान करतो. लाल डबा ते लाल परी st च्या या प्रवासातील एक टर्निंग पॉईंट ठरले मालकांचे बारीक निरीक्षण.
St च्या आढावा बैठकीत प्रवासी संख्या घटल्याचे लक्षात आले. त्यावेळी एका बसची आसन क्षमता किती आहे याची माहिती घेतली तर ती साधारण 62 ते 64 असल्याचे दिसून आले. तर प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची सरासरी संख्या 52 ते 54 होती. म्हणजे 10 सीट्स रिकाम्याच राहतात आणि त्यामुळे st बस मधील जागा कमी होऊन प्रवास्यांना अडचण होते, दाटीवाटीने बसताना हालचालही करता येत नाही, सुखकर प्रवासाचा अनुभव मिळत नाही. जर 50 ते 54 प्रवासी प्रवास करणार असतील तर रिकामे राहणारे 10 सीट्स काढून टाका, 52 प्रवाश्यांना सुखाचा प्रवास होऊ द्या, ते परत st नेच प्रवास करतील, उगीच रिकाम्या सीट्स कशाला ठेवता ? अशी सूचना मालकांनी केली आणि 64 सिटांचा लाल डबा आटोपशीर, आरामदायी 54 सिट्सची लाल परी झाली. त्यामुळेच पूढे st ची प्रवासी संख्या वाढीस मदत झाली.
त्यांच्याकडे st महामंडळ आले तेव्हा सुमारे 950 कोटी रुपये तोटा होता. मात्र जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा st नफ्यात धावत होती. बंद पडलेले साखर कारखाने, सहकारी संस्था, मोडकळीस आलेल्या संस्थांना उर्जितावस्था आणून देणाऱ्या पंतांनी st महामंडळास ही अशीच उर्जितावस्था आणून दिली.
नंतर पुन्हा st खड्ड्याकडे जात हा दोष नंतरच्या राज्य आणि धोरणकर्त्यांचा आहे.
मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनात आजही सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याविषयी आदरभाव असल्याचे दिसून येते.