पूर्णवेळ अध्यक्षांसह समितीची फेररचना आवश्यक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ अध्यक्ष नाही, त्यातच निष्क्रिय सदस्यांचा भरणा आणि कोरोनाचे संकट यामुळे राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल – रुक्मिणी देवस्थानचा कारभार ठप्प असून अनेक विकास कामे रखडली आहेत. राज्य सरकारने श्री विठ्ठल देवस्थान कडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे मानले जात असून नवीन पूर्णवेळ अध्यक्ष आणि कार्यक्षम समिती सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्याची गरज व्यक्त होत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या पंढरीत अर्ध्याहून अधिक भारतातून भाविक दरवर्षी येत असतात. त्या भाविकांना सर्व त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, देवस्थानचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याअनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीची स्थापना करण्यात आली. मात्र स्थापनेपासून समिती मूळ हेतू अनुरुप काम करताना दिसून आली नाही.
तत्कालीन भाजप सरकारने कराडच्या अतुल भोसले यांची अध्यक्षपदी तसेच पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली आणि त्यानंतर मंदिर समितीच्या कारभारात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून आले. समिती सदस्य, पदाधिकारी आणि शासन नियुक्त प्रशासन यांचा योग्य ताळमेळ बसल्याने दोन वर्षात अनेक महत्वाचे प्रश्न सुटले आणि देवस्थानचा विकास झाला.
मात्र मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी अतुल भोसले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सह अध्यक्ष असलेल्या ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी आली. मात्र समितीमध्ये भाजप समर्थक सदस्यांचा भरणा अधिक असून त्यांची भूमिका देवस्थानच्या विकासात अडसर आणण्याची असल्याचे मागील एक वर्षात दिसून आले आहे.
गेल्या वर्षभरात समिती सदस्यांनी देवस्थानच्या विकासासाठी एक रुपयांचा हातभार लावलेला नाही, एखादा दानशूर देणगीदार आणला नाही की देवस्थानच्या एखाद्या कामाचा पाठपुरावा शासन दरबारी केलेला नाही. उलट व्यक्तिगत हेतूने अनेक वेळा समितीच्या कारभारात आडकाठी आणण्याचे प्रयत्न केले आहेत. देवस्थानची बदनामी कशी होईल या अनुषंगाने प्रयत्न झाल्याचे ही दिसून आले आहे. समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज स्वतः धडाडीने पुढे येऊन काम करीत नाहीत अशा तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत.
त्यातच मार्च पासून कोरोना महामारी मुळे मंदिर बंद राहिले आणि देवस्थानचे दैनंदिन उत्पन्न ठप्प झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर समितीचे उत्पन्न वाढीसाठी समिती सदस्यांनी काही एक प्रयत्न केले नाहीत. समितीवर असलेल्या काही महाराज मंडळींनी तर समिती सदस्यत्वाचा प्रभाव पाडून आपल्या संस्थान साठी देणगीदार शोधल्याचे बोलले जात आहे. या सर्व परिस्थितीत मंदिर समितीचा गाडा जागच्या जागी ठप्प झाल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे आषाढी यात्रा आणि कार्तिकी यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय महापूजेस येथे आले मात्र त्यांच्याकडूनही देवस्थानच्या एकही कामासाठी हातभार लागलेला नाही असेही दिसून आले. कोरोना मुळे देवस्थानचे उत्पन्न ठप्प झाले असून समितीचे एक-दोन अपवाद वगळता सर्व सदस्य ही निष्क्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्ष निवडून तसेच निष्क्रिय आणि वाद निर्माण करणाऱ्या काही सदस्यांना डच्चू देण्याची मागणी होत आहे. मंदिर समितीची फेररचना आवश्यक असून राज्य सरकारने राज्यातील इतर देवस्थान च्या बाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले मात्र श्री विठ्ठल – रुक्मिणी देवस्थान दुर्लक्षित केल्याचे दिसून आले आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असून समितीच्या कारभारास गती देण्यासाठी राज्य सरकार काही ठोस पावले उचलणार आहे की नाही याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.