पोलीस ठाण्यात कंट्रोल रूममध्ये काम करणार : नवीन वर्षातील पहिला कॉल घेणार
टीम : ईगल आय मीडिया
दिवाळी नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांसोबत साजरी करनारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नवीन वर्षाचे स्वागतही पोलिसांच्या सोबतीने ” on duty ” करणार आहेत. त्यासाठी त्यांनी happy new year सेलिब्रेशन कसं करणार आहे तेसुद्धा जाहीर केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आजच्या रात्री पोलीस दलाचा उत्साह वाढवण्याच्या हेतूने ते स्वतः नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. एवढंच नाही तर, ‘कंट्रोल रूम’ ला येणारा नव्या वर्षातला पहिला कॉल, स्वत: अनिल देशमुख घेणार आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख हे संवेदनशील मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी कोरोना काळात रस्त्यावर अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांशी संवाद साधला होता आणि सर्व 32 जिल्ह्यात दौरा केला होता. तर यंदाची दिवाळी त्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलिसांसोबत साजरी केली होती. पोलिसांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा, त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे निष्पन्न झाले आहे. आज 2020 सालास निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत ही पोलिसांसोबत करण्याचे देशमुख यांनी जाहीर केले आहे.
याबाबत बोलताना ना. देशमुख म्हणाले, ‘मी स्वतःला महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख मानतो. करोना साथीच्या काळात माझे सर्व सहकारी अथक परिश्रम करत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी मी ३२ जिल्ह्यांमध्ये दौरे केले होते. मी त्यांच्या सोबत आहे याची जाणीव करून देण्याचा उद्देश त्यामागे होता. प्रत्येक उत्सवात व सणासुदीच्या काळात पोलीस दल रस्त्यावर असते. आजचा दिवसही त्याला अपवाद नसेल. संपूर्ण जग नववर्षाचं स्वागत करत असेल. जल्लोष करत असेल तेव्हा माझे सहकारी सर्व जनतेच्या व महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील. म्हणूनच या क्षणी मी त्यांच्या सोबत राहणार आहे.’
‘पोलीस नियंत्रण कक्षातील माझ्या कर्मचाऱ्यांना सतत ‘अलर्ट’ राहावं लागतं. त्यांच्या कामाच्या तुलनेत त्यांना मानसन्मान वा अधिकार मिळत नाही. हा विभाग काहीसा दुर्लक्षित आहे. त्यामुळंच ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस नियंत्रण कक्षात जाऊन मी तिथल्या कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहे. एवढंच नव्हे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांच्या सोबत कामही करणार आहे,’ असं देशमुख यांनी सांगितलं.