जोर स्वाभिमानीचाच , दिली हाक मिळाला प्रतिसाद!

दूध बंद आंदोलनात दूध उत्पादकांचा उस्फुर्त सहभाग

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भाजप आणि सदाशिव खोत यांच्या संघटनेचे दूध दर आंदोलन पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनास मात्र राज्यातील विविध भागातून दूध उत्पादकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आजही राज्यात शेतकऱ्यांमध्ये जोर स्वाभिमानीचाच आणि क्रेझ राजू शेट्टी यांचीच असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांकडून आजही प्रतिसाद मिळतो हे मंगळवारच्या आंदोलनानंतर पुढे आले.

ऊस दरवाढीचे आंदोलन असो वा दुधाचा प्रश्न यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हिरीरीने मैदानात उतरत असते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी चळवळ मोडीत काढण्याचा, संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून झाला. मात्र, अशा स्थितीतही राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडणे सुरू ठेवले.
आज महाविकास आघाडी मध्ये घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी असली तरी, त्यांनी शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न मांडणे बंद केलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांवर ही संघटना आवाज उठवत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी झालेल्या दूध बंद आंदोलनात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. राजू शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही शेतकरी आंदोलनात सहभागी होतात. शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना मिळणारा प्रतिसाद हा महत्त्वाचा ठरतो आहे.

राज्यात विरोधी पक्ष म्हणून भाजपकडून शेतकरी प्रश्नावर एखादं आंदोलन केलं तरी त्याची फारशी चर्चा होत नाही. दोनच दिवसांपूर्वी झालेले माजी कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या संघटनेचे आंदोलन तर अगदीच प्लॉप गेल्याचे दिसून आले. त्या आंदोलनाच्या केवळ मीडियामधून बातम्या आल्या मात्र ग्रामीण भागात त्या आंदोलनाची फारशी चर्चा झाली नाही, शेतकऱ्यांचा पाठिंबा ही मिळाला नाही. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तयार केलेले कार्यकर्त्यांचे जाळे आजही कायम असल्याचे आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आले.

निवडणुकीच्यावेळी पक्ष, नेता बघायचा. मात्र शेतकरी प्रश्नांच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी यांना पाठिंबा अशी भूमिका घेणारे अनेक शेतकरी आजही पाहायला मिळतात. ही संघटनेची मोठी जमेची बाजू आहे. इतर तथाकथीत शेतकरी नेत्यांना शक्य होत नाही. सोमवारी महायुतीमधील घटक पक्षांनी देखील दूध दरवाढ प्रश्नी आंदोलन केले होते. मात्र त्याला तितकासा प्रतिसाद जनमानसातून मिळाल्याचे दिसून आले नाही. मात्र, स्वाभिमानीच्या आंदोलनास सामान्य शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
यावरून राज्यात आजही स्वाभिमानीचाच जोर असल्याचे सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!