मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार तरटी वृक्षाचे रोपण !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वारकरी परंपरेत मानाचे स्थान असलेल्या संत कान्होपात्रा समाधी जवळ तरटी वृक्षाचे रोपण येत्या आषाढी यात्रेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी दिली.
विठ्ठल मंदिराच्या परिसरात, महालक्ष्मी मंदिरासमोर आणि विठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूला संत कान्होपात्रेची समाधी आहे. या समाधीजवळ तरटी वृक्ष होता. वारकरी संप्रदायात संत कान्होपात्रेला मोठे महत्व आहे. मंगळवेढा येथील अतिशय सुंदर असलेली गणिका कान्होपात्रा निस्सीम विठ्ठल भक्त होती. बिदरच्या बादशहाच्या कानावर कान्होपात्रेच्या सौंदर्याची महती गेल्यानंतर त्याने कान्होपात्रेस आपल्या दरबारात हजर करण्याचे फर्मान सोडून शिपाई पाठवले. तिची अंतिम ईच्छा म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी कान्होपात्रेला घेऊन शिपाई पंढरपूरला आले, विठ्ठल मंदिरात दर्शनास कान्होपात्रा गेली आणि तिने विठ्ठलास आपल्या समोरील संकट सांगितले. तेव्हा विठ्ठलाने तिला आपल्या जवळ जागा दिली, कान्होपात्रा मंदिरात जिथे लुप्त झाली तिथेच तरटी वृक्ष उगवला, अशी आख्यायिका सांगितली जाते.
तेव्हापासून विठ्ठल दर्शनास आलेला वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर पडला की अगोदर कान्होपात्रेच्या समाधीचे दर्शन घेतो आणि त्या ठिकाणी असलेल्या तरटी वृक्षास स्पर्श करून पुढे रुक्मिणी मातेच्या दर्शनास जातो, अशीही परंपरा आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना श्री विठ्ठल जोशी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी हा तरटी वृक्ष वठून गेला होता तसेच वेळोवेळी रंगकाम केल्याने समाधी स्थान विद्रुप दिसत होते. संत कान्होपात्रेचे वारकरी संप्रदायातील स्थान लक्षात घेऊन कोरोना काळात दर्शन बंद असल्याने मंदिर समितीने अनेक प्रलंबित कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार कान्होपात्रा समाधीचा जीर्णोद्धार आणि वठून गेलेल्या जागी पुन्हा तरटी वृक्षाची लागवड करण्यात येत आहे.
येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असून त्यावेळी या पौराणिक महत्व असलेल्या तरटी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पुन्हा संत कान्होपात्रा आणि तरटी वृक्षाचे दर्शन सुलभ होणार आहे. मंदिर समितीकडून करण्यात येत असलेल्या या पौराणिक तरटी वृक्षारोपनाचे भाविकातून स्वागत होत आहे.