गुरुचे ऋण व्यक्त करण्यासाठी Thank A Teacher अभियान

शिक्षक दिनानिमित्त गुरूविषयी व्यक्त होण्यासाठी खास अभियान

पंढरपूर : ईगल आय मीडिया
समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे कार्य महत्त्वाचे आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की ज्यांच्यामुळे जीवनाला नवीन वळण मिळते,आपल्याला आवश्यक असेल अशावेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केलेले असते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले, अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने ५ सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त खास अभियान राबवत आवडत्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी दिली आहे.

दरवर्षी शिक्षक दिनाच्या
दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे, अशांचा गौरव करण्यात येतो. परंतु कोविड-१९ या रोगाच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाणे
साजरा करता येणे शक्य नसले तरी प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी व सर्व क्षेत्रातील व्यक्तीला ते ज्यांना गुरू मानतेत, त्यांच्याप्रती मनोगत व्यक्त करण्यासाठी Thank A Teacher अभियान राबविण्यात आले आहे.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळेत शिकविण्याऐवजी शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यत ज्ञान पोहोचवत आहेत, प्रसंगी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे अमुलाग्र बदल झाले आहेत ते शब्द रूपाने व्यक्त करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे.हे अभियान सोशल मीडिया व्दारे राबविण्यात आले आहे, या उपक्रमात विद्यार्थी, पालक व अधिकाऱ्यांना त्यांच्या शिक्षकांचे आभार मानण्याची एक संधी आहे,

लोकप्रतिनिधी, अधिकारी, अभिनेते यांनी यात सहभागी होऊन कौतुकास पात्र असणाऱ्या शिक्षकांचा शब्दरूपी सन्मान करावा, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, संशोधन, सांस्कृतिक इ क्षेत्रातील व्यक्ती नी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे.


शिक्षण विभागाचा चांगला उपक्रम

आतापर्यंत शिक्षण विभागाने काढलेल्या जीआर मुळे शिक्षकांच्या मनात रोष निर्माण होत होता, परंतु सोमवारी शिक्षण विभागाने शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी काढलेल्या जीआर मुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल. भारताचे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. अभिनंदनास पात्र असणाऱ्या शिक्षकांचा कोरोनामुळे प्रत्यक्ष सन्मान करता येत नसला तरी शब्दरूपी सन्मान करता येईल ज्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी अधिक उर्जा मिळेल.
– प्रा. भीमा व्यवहारे
प्रसिद्धीप्रमुख, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती

Leave a Reply

error: Content is protected !!