पोटनिवडणुकीत लढावे की नाही ?


आ. परिचारक गटासमोर धर्म संकट


पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीला उद्यापासून ( 23 मार्च ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असली तरी निवडणूक लढवायची की नाही याविषयी अद्यापही परिचारक गटाचा निर्णय झालेला नाही. भाजपच्या इच्छुक यादीत त्यांचे नाव असले तरी ते स्वेच्छेने दिले की पक्षाने घुसडले हे स्पष्ट झालेले नाही. एकंदरीत परिचारक गट ही पोटनिवडणुक लढवावी की नाही याबाबत धर्म संकटात असल्याचे दिसते. यापूर्वी कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत एवढी मोठी कुचंबणा आणि अडचण परिचारक गटाची कधीही झाली नव्हती.


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजून 8 दिवस झाले, मंगळवार ( उद्या ) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत मतदारांची मोठी सहानुभूती भालके परिवाराच्या बाजूला असल्याने त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार चाचपडत प्रयत्न करीत आहेत.

अनेकांनी अनेक पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असली तरी त्यात जिंकण्याचा आत्मविश्वास कमी दिसून येत आहे. केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा 2024 सालची दावेदार मजबूत करण्यासाठी काही जण निवडणूक लढवण्याची भाषा करीत असल्याचे दिसते. दामाजी सहकारी चे अध्यक्ष समाधान अवताडे यांचा अपवाद वगळता इतर इच्छुक केवळ चर्चेत राहण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते. चमकोगिरी च्या या उधळणीत तालुक्यातील सर्वात मोठी राजकीय शक्ती असलेल्या परिचारक गटात मात्र शांतता आहे. येत्या काही दिवसात त्यांच्याकडून बैठक बोलावली जाऊ शकते. मात्र निवडणूक लढवावी की नाही याबाबत परिचारक गट द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसते.

परिचारक गटाचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघावर तब्बल 25 वर्षे वर्चस्व राहिले आहे आणि मागील 3 विधानसभा निवडणुकीत परिचारक गट हाच प्रमुख स्पर्धक राहिला आहे. तरीही या पोटनिवडणुकीत परिचारक गटाची अभूतपूर्व अशी अडचण झाली आहे. परिचारक सध्या भारतीय जनता पक्षात आहेत आणि या पक्षाविषयी पंढरपूर मतदारसंघात जनमत प्रतिकूल आहे,याचा अनुभव परीचारकाना आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा या पक्षाकडून निवडणूक लढवणे पराभवाला आमंत्रण दिल्यासारखे आहे.

उमेदवारी नाही घ्यावी तर मग पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करावा लागणार आहे. भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना निवडून आणणे परिचारक यांच्यासाठी दीर्घकालीन तोटयाचे ठरणारे आहे. शिवाय निवडणूक न लढवावी तर गटाच्या कार्यकर्त्यामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. पुढील विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम अधिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर परिचारक गटाचे दैवत माजी आम.सुधाकरपंत परिचारक यांचे ही दुर्दैवी निधन 7 महिन्यांपूर्वी झालेले आहे, त्यांच्या निधनानंतर 7 महिन्यात निवडणुकीच्या बोहल्यावर चढणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर आ.प्रशांत परिचारक यांच्या विधानपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली आहे, त्या निवडणुकीत उतरणे क्रमप्राप्तच आहे. 2019 ला लढले आहेत, पोटनिवडणुक लढवली तर पुन्हा विधानपरिषद ही लढावी लागणार आहे. त्यामुळे सलग किती निवडणुका लढवायच्या ? असाही प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपल्याच गटातील दुसरा उमेदवार उभा करून पोटनिवडणुक लढवावी तर उमेदवारी द्यायची कुणाला ? पुन्हा भाजपचे काय करायचे ? असाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुक लढवावी की नाही अशा धर्मसंकटात परिचारक गटाचे नेतृत्व असल्याचे दिसते. गेल्या 40 वर्षीच्या राजकीय अस्तित्वात परिचारक गटाची एवढी राजकीय कुचंबणा यापूर्वी कधीही झाली नव्हती. या संकटातून नेतृत्व गटाला पुढे कशा प्रकारे घेऊन जाते याकडे पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!