जिल्हाधिकाऱ्यांची बदली हाच कोरोनावरील उपाय !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या 4 दिवसांपासून पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांचा, किरकोळ विक्रेत्यांचा, दुकानदारांचा, रस्त्याकडेला उभा राहून छोटा व्यवसाय करणाऱ्या पथारी वाल्यांचा, सर्व सामान्य नागरिकांचा सुरू असलेला आक्रोश, टाहो कर्णबधिर जिल्हा प्रशासनाला ऐकू आलाच नाही. आणि शेवटी 10 दिवसांचे कठोर निर्बंध पंढरपूर शहरावर लादले आहेत. कोरोनाच्या आगमनापासून, गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात सगळं काही बंद करण्याची आपली कर्तव्य तत्परता जिल्हाधिकाऱ्यांनी आताही दाखवून दिली आहे. ‘रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला’ देण्याचा प्रशासकीय लौकिक जपल्याबद्दल खरे तर जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर आणि त्यांच्या टीम चे अभिनंदन करायला हवे !

खरे तर कोरोना चीनमध्ये असताना देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि अगदी पंढरपूरमध्ये निर्बंध लादले होते. तरीही कोरोना आला आणि गावोगावी, घरोघरी ऐसपैस हात पाय पसरून बसला असून परत निघायचे नावच घेत नाही. हे प्रशासनासह आपल्या सर्वांचेच अपयश आहे. प्रशासनाच्या निष्क्रिय आणि दिशाहीन नियोजन व ढिसाळ अंमलबजावणी सोबत आपली ही बेजबाबदार वागण्याची सवय कोरोना प्रसारास कारणीभूत आहे हे नाकारता येत नाही. तरीही पालनकर्ते म्हणून याकाळात जिल्हा प्रशासनाने काय केले ? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

रुग्णांची रोजची माहिती लोकांना देणे, सोलापूरच्या ऑफीसमध्ये बसून नुसत्या प्रशासनाच्या बैठका घेणे, रस्ते, गावे, बाजारपेठा बंद करणे, दंडाच्या नावाखाली ‘पाकिटमारी’ करणे, लोकांना रुग्णवाहिकेसाठी, बेडसाठी, औषधासाठी, लसीकरणासाठी तडफडत सोडून देणे, याला काही कर्तव्यतत्परता मानता येणार नाही. जागतिक महामारीच्या काळात सर्वात बेफिकीर, निष्क्रिय प्रशासन सोलापूर जिल्ह्याने अनुभवले आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यात जनजीवन सुरळीत चालू आहे, अगदी सर्वाधिक गर्दीच्या मुंबईतसुद्धा आता ते पूर्वपदावर आलेले असताना सोलापूर जिल्ह्यात जनजीवन सुरळीत का होत नाही ? बंद ठेवूनही कोरोना आवरला जात नाही हे दिसत असूनही पुन्हा-पुन्हा निर्बंधाचा फास का आवळला जातोय ? जिल्ह्यातील लोक मागील दीड वर्षातील सर्वाधिक काळ केवळ ‘बंद आणि निर्बंध’ यातच जगले आहेत. एवढे करूनही कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीतच. मग सगळे काही बंद करून साधले काय असा प्रश्न आणखी मोठा आणि उग्र होतो.

‘कोरोना सह जगायला शिका’ असे मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीच सांगितले आहे आणि देशाच्या प्रमुखांनीसुद्धा तेच सांगीतले आहे. तरीसुद्धा आपण कोरोना च्या नावाखाली सगळे दैनंदिन जीवन वारंवार का गोठवून टाकत आहोत. मागील दीड वर्षात शहरे बंद, गावे बंद, बाजारपेठा बंद, दुकाने बंद, एसट्या बंद, रस्ते बंद, देवळे, मशिदी, यात्रा, जत्रा बंद, पारंपरिक सण, उत्सवांना मर्यादांचे दोरखंड लावून तरी काय साध्य झाले? मा.जिल्हाधिकारी यांना सगळं काही बंद ठेवण्यात कसली धन्यता वाटते कुणास ठाऊक ? पुन्हा एकदा 5 तालुक्यात त्यांनी त्यांचा बंद ठेवण्याचा आवडत खेळ खेळला आहे.

पंढरपूर शहर हे सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेले शहर आहे. आणि इथं दररोज 10-20 रुग्ण सापडतात. ते अगदी नगण्य आहेत तरीही पंढरपूर शहरात संचारबंदी लावली गेली आहे. पंढरपूर च्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक आहे, हे खरे असले तरी ग्रामीण भागात काही प्रमाणात निर्बंध लावून शहरातील जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याची मागणी विचारात घेतली जात नाही. गेल्या 4 दिवसांपासून पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिक टाहो फोडून सांगत आहेत की, संचारबंदीचा फास लावू नका. अगोदरच सर्व बाजूनी नागवले गेल्यानंतर व्यापाऱ्यांना, सामान्य नागरिकांना पुन्हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार देऊ नका. अगदी राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांनी फोन करून निर्णयाबाबत सूचना केल्या तरीही त्यांच्या सूचनानाही केराची टोपली दाखवली.

लोकप्रतिनिधी सांगून थकले, हतबल झाले, तरीही कर्णबधिर जिल्हा प्रशासनाला पंढरपुर बंद ठेवण्यातच कसला पराक्रम आणि कर्तव्य तत्परता दिसतेय कुणास ठाऊक. एक प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे कोरोना काळात अगदीच सुमार ठरलेले आहेत. या काळात बंद करण्याशिवाय त्यांना काहीही जमलेले नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे, धोरण आणि अंमलबजावणीमधील फोलपणामुळे लोकांनी खूप हाल सहन केले आहेत. दवाखान्यापासून ते लसीचा रांगेपर्यंत केवळ लोकांना लुटले आहे, पावलोपावली त्रास दिला,वेदना दिल्या आहेत. दिलासा तर कसला नाहीच, प्रशासकीय निर्दयतेपुढे अगदी कोरोना सुसह्य वाटला असता अशी लोकांची भावना झालेली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली करणे हाच कोरोना रोखण्यासाठी एक उपाय ठरेल.

One thought on “जिल्हाधिकाऱ्यांची बदली हाच कोरोनावरील उपाय !

  1. जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून त्यांची बदली हवी असे म्हणणे चुकीचे वाटत आहे

Leave a Reply

error: Content is protected !!