शेतकऱ्यांना 30 वर्षानंतरही नुकसानभरपाईची प्रतीक्षा

पंढरपूर तालुक्यातील उजनी वितरिका क्र २४ मुळे बाधित शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

शेळवे : संभाजी वाघुले

उजनी उजवा कालवा वितरिका क्र.२४ या कालव्यासाठी 30 वर्षांपूर्वी जमिनी संपादित केल्या आहेत, मात्र अद्यापही त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाने तातडीने या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करून शेतकऱ्यांनी मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

पंढरपूर तालुक्यातील पळशी- उपरी – भंडीशेगाव – शेळवे – खेड भाळवणी – कौठाळी -शिरढोन या गावातील शेतकाऱ्यांच्या जमिनी उजनी कालवा वितरिका क्र २४ करिता 1990 च्या दरम्यान संपादित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी शेतकर्यांना जमिनीचा मोबदला लवकर व समाधानकारक मिळावा अशी अपेक्षा होती. परंतु वारंवार मागणी करुनही शासन दखल घेत नसल्याने 30 वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा आहे.

ज्या शेतकऱ्यांना वितरेकेचा मोबदला मिळाला तो अगदीच तुटपुंजा आहे. यामुळे याही शेतकरी वर्गातुन आम्हालाही सर्वासमान मोबदला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उजनी च्या उजव्या कालव्यासाठी १९९० साली पळशी ते उपरी, शेळवे, खेडभाळवणी, शिराढोन असा कालवा खोदण्यात आला. याकरिता शेतकऱ्यांच्या काळ्या कसदार जमीनी संपादित करण्यात आल्या. अनेक ठिकाणी शेताच्या मध्यातून कालवा गेल्याने काही शेतकरी आपली पूर्ण जमीन गमावून बसले आहेत. त्यांना ३० वर्षांपासून कालव्याच्या कोणत्याही बाजूची जमीन कसता येत नाही.

जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नुकसानभरपाई देऊन जमीन खरेदी करणे आवश्यक होते. परंतु शेतकऱ्यांची रोजीरोटी असलेली जमीन उजाड करून त्यांना भीक दिल्यासारखे कवडीमोल रक्कम देऊन जमिनी घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
संपादित जमिनीचे जिरायती,कोरडवाहू, बागायती, हंगामी बागायती अशी वर्गवारी केली,व वेगवेगळी किंमत देऊन जमिनी घशात घालण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मागील 30 वर्षांपासून लाभविना उपेक्षित असलेला हा शेतकरी सध्याच्या बाजारभावाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करीत आहे.

30 वर्ष हे पाटबंधारे विभाग कागदी घोडे नाचवत आहे, यांनी गट नंबरचे तुकडे पाडतानाही खूप मोठा घोळ घातला असून ते निस्तारताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे.

नुकसान भरपाई न देताच संपादित केलेल्या जमिनीवरील कालवा हद्दीत शेतकऱ्यांनी स्व खर्चातून केलेला पूल सुद्धा उचकटून टाकत आहेत, शेतकऱ्यांची पाईपलाईन नळी jcb ने मोडून काढत आहेत त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे. या कॅनॉलग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाई नाही मिळाल्यास तो तीव्र जनांदोलच्या तयारीत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!