महापुरास जबाबदार : उजनी व्यवस्थापनाविरोधात कारवाईची मागणी

अगोदर निलंबित करा अन्यथा : स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार


पंढरपूर : ईगल आय मीडिया

हवामान विभागाने ईशारा देऊनही उजनी धरणातून वेळेवर पाणी न सोडता भीमा नदी काठच्या 95 गावांना आणि हजारो शेतकऱ्यांना, पंढरपूर शहरातील हजारो नागरिकांना महापुरात ढकलून देणाऱ्या उजनी व्यवस्थापणाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावागावातून होऊ लागली आहे.

दरम्यान हजारो हेक्टर पिकांचा नाश करून शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी दिला आहे.


उजनी धरणातून 14 ऑक्टोबर रोजी दिवसात 10 हजार ते 2 लाख 25 हजात क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला अचानक महापूर आला. नदीकाठची हजारो एकर पिके त्यामुळे पाण्यात गेली. पंढरपूर शहरात 13 वर्षानंतर महापुराचे पाणी सखल भागात गेले आणि नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी गेले. त्यामूळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेकडो घरांची पडझड झाली असून लोकांच्या प्रापंचिक वस्तू, दुकानातील मालाचे, किमती वस्तूंचे नुकसान झाले आहे. हा महापूर आणि हे नुकसान टाळता आले असते मात्र उजनी धरण व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणा मुळे हा महापूर आल्याचा आरोप होत आहे.


14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतरही उजनी व्यवस्थापन गाफील राहिले आणि 14 अक्टोबर रोजी सुद्धा धरणाची पाणी साठा पातळी 111.28 टक्के एवढी राखली. 13 ऑक्टोबर रोजी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही 75 मिलीमीटर पाऊस पडला होता तरीही 14 ऑक्टोबर रोजी सकाळी धरणातून केवळ 10 हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येत होते. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून धरणातून अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केली. काही तासात भीमा नदीचा विसर्ग 10 हजारावरून 2 लाख 25 हजार क्यूसेक इतका वाढवण्यात आला.

त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना, शेतकऱ्यांना आपली घरे दारे, दुकाने, शेतातील साहित्य जसेच्या तसे सोडून पलायन करावे लागले. त्याच दरम्यान तालुक्यातही संततधार सुरू असल्याने लोकांना, तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशासनासही अपेक्षित मदत पोहोचवता आली नाही. हजारो घरे, शेकडो दुकाने, अनेकांचे व्यवसाय, पाण्यात गेली. पंढरपूर शहरात नागरिकांची दाणादाण उडाली. रात्रीच्या अंधारात मिळेल तिथे आसरा घेण्याची वेळ आली.

ही परिस्थिती उजनी धरण व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे, निष्क्रियतेमुळे निर्माण झाल्याचे आता गावोगावी बोलले जात आहे. गेल्या वर्षी सुद्धा उजनी व्यवस्थापनाच्या याच निष्क्रियतेमुळे धरण 106 टक्के भरल्यानंतर पाणी सोडले आणि पुराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यावर्षी सुद्धा हाच बेजबाबदारपणा उजनी व्यवस्थापणाने दाखवला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पाणी सोडण्यात विलंब का लागला, कुणामुळे लागला याचीही चौकशी व्हावी. अशी मागणी होऊ लागली आहे.

लोकप्रतिनिधींच्या सुचनेकडेही दुर्लक्ष उजनी व्यवस्थापनास पंढरपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी फोन करून धरणातील पाण्याची कल्पना दिली होती. पूर स्थिती निर्माण होणार नाही यासाठी धरणात पुरेशी साठवण क्षमता राखावी आणि धरणातून पाणी कमी करावे अशी सूचना केल्यानंतर ही त्याकडे दुर्लक्ष करून धरण व्यवस्थापन निष्क्रिय राहिले आणि जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यास महापुरात लोटले असे दिसून येते.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी, या संदर्भात न्यायालयात जाण्याचा ईशारा दिला आहे. सप्टेंबरमध्ये दोनवेळा उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरनास पत्र लिहून धरणात 100 टक्के पातळीवर पाणी ठेवावे आणि पूर येणार नाही याचे नियोजन करावे अशी मागणी केली होती. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि हजारो शेतकऱ्यांना महापुरात लोटले असा आरोपही तानाजी बागल यांनी केला आहे. संघटना शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात जाईल, संबंधित अधिकाऱ्यांना अगोदर निलंबित करावे आणि या महापुराची चौकशी करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशाराही बागल यांनी दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!