उजनीच्या पाणी साठ्यात 74 टक्केची तूट

10 ऑगस्ट 2019 रोजी 100 टक्के होते : यंदा 26 टक्के

पंढरपूर : ईगल आय मीडिया
मागील वर्षी उणे 51 टक्केवरून उजनी धरण 10 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले होते. मात्र यंदा उजनी धरणावर समाधानकारक पाऊस पडूनही 10 ऑगस्ट रोजी जेमतेम 26 टक्के इतका पाणी साठा झालेला आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील धरणातून अद्यापही 50 टक्केची आसपास पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरलेले आहे. पुणे जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असलेल्या धरणात यंदा आप कमाई म्हणजेच उजनीवर पडलेल्या पावसामुळे 25 टक्के पाणी साठा झालेला आहे. पुणे जिल्ह्यात यंदा पावसाने पहिल्या पासून ओढ दिली आहे. त्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक अत्यल्प आहे. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणातील साठा वाढेल अशी अपेक्षा असतानाच पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग आता 5 हजार क्यूसेक्स पर्यंत खाली आला आहे.
मागील वर्षी उजनी धरण उणे 51 टक्के पर्यंत रिकामे झाले होते. तिथून भरतीचा प्रवास सुरु होऊन 10 ऑगस्ट रोजी उजनी 100 टक्के भरले होते. मात्र यंदा धरणावर चांगला पाऊस पडूनही धरण जेमतेम 26 टक्के भरले आहे. म्हणजेच गतवर्षी च्या तुलनेत यंदा 74 टक्के पाण्याची तूट दिसून येते.

निरेच्या खोऱ्यात अजूनही 13 tmc ची तूट

निरेच्या खोऱ्यातही पाऊस बंद झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात सुधारणा झालेली नाही. गतवर्षी च्या तुलनेत निरेच्या खोऱ्यातील 4 धरणात अजूनही 13 tmc पाण्याची तूट आहे. या भागातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे निरा नदीला वीर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता धूसर आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता वीर धरणात 90.73 टक्के, भाटघर धरणात 67.70 टक्के, नीरा देवघर धरणात 54.70 टक्के, गुंजवणी धरणात 84.48 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!