भारत नानांच्या आठवणीने विधानसभा हळहळली !

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षानेत्यांसह सभापतींनी ही जागवल्या आठवणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आठवणीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण सभागृह हळहळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती नाना पटोले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आ.भारत नानांच्या सभागृहातील आणि सार्वजनिक, राजकीय, सामाजिक कार्याला उजाळा दिला. भारत नाना सारखा नेता सभागृहात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

दरम्यान, विधानसभा सभापती नाना पटोले यांनी, महाराष्ट्र हे राज्य नवीन आदर्श निर्माण करणारे राज्य आहे, ज्या प्रमाणे शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात निवृत्त सदस्यांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला तसाच एक निर्णय आज घेऊ, निधन पावलेल्या विधानसभा सदस्यांना विधानसभेच्यावतीने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानसभेच्यावतीने ‘स्मृती पत्र’ देण्यात यावे अशी सूचना मांडली. त्याचबरोबर पहिले स्मृती पत्र भारत नानांसाठी तयार केले जात असल्याचे सांगितले. या अर्थाने भारत नानांचा सभागृहाने सन्मान केला असून सभागृहाच्या इतिहासात प्रथमच दिवंगत सदस्यांना अशा प्रकारे मरणोत्तर सन्मानित करण्याचा निर्णय सर्व सभागृहात एकमताने घेण्यात आला. आणि पहिले स्मृती पत्र भारत नानांच्या आठवणींचे असेल. हे स्मृती पत्र शासकीत यंत्रणेच्यावतीने प्रांताधिकारी, तहसीलदार स्वतः भारत नानांच्या घरी जाऊन कुटुंबाकडे सुपूर्द करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, भारत नाना हे पैलवान होते, बोलणे रांगडे, ग्रामीण शैलीचे, व्यक्तिमत्व आक्रमक असले तरी मनाने संवेदनशील होते. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी मैत्री केली. 2004 सालची विधानसभा निवडणुक आजून आठवते त्यावेळी ते आमच्या पक्षाकडून निवडणूककिला उभा होते आणि प्रचंड मोठी सभा त्यांनी घेतली, त्या निवडणुकीत जरी ते हरले तरीही नंतर नेटाने काम करून त्यांनी 3 वेळा विजय मिळवला. आज ते या सभागृहात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे सांगितले.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, भारत नाना आपल्यात नाहीत हे पटत नाही. त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्नासाठी सभागृहात आणि बाहेरही नेहमी आवाज उठवला. तीन वेळा तीन वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आले, त्यांचे पाय जमिनीवर असायचे, कोरोनावावर ही त्यांनी मात केली मात्र जुन्या आजारांनी त्यांना पुन्हा घेरले आणि आपल्यातून नेले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत असे सांगताना अजितदादा भावुक झाले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही भारत नाना यांच्या कार्याचा गौरव केला. लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे लोकनेते होते, त्यांनी पंढरपूर शहर आणि मतदारसंघाच्या विकास कामासाठी नेहमी प्रयत्न केले. आषाढी यात्रेच्या वेळी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. विकास कामे, साखर कारखानाचे प्रश्न घेऊन ते नेहमी यायचे. त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते, ग्रामीण शैलीतील वक्तृत्व यामुळे ते आपली छाप पाडून जात होते. आज आपल्याला सोडून गेले हे अविश्वसनीय असल्याचे ही फडणवीस यांनी आपल्या आठवणी सांगताना बोलून दाखवले.

Leave a Reply

error: Content is protected !!