माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांच्या सर्व्हेक्षण आणि निधीसाठी निर्देश
माळशिरस : ईगल आय मीडिया
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शब्दाला शासन दरबारी किती मान आहे, याची प्रचिती येत असून विजयदादांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्र लिहून माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 18 गावातील कालव्यासाठी निधी आणि नवीन 10 गावांचा समावेश करण्यासाठी सर्व्हे करण्याची मागणी केली. या मागणीवर जयंत पाटलांनी तातडीने निर्णय घेत निधीची उपलब्धता आणि नवीन गावांचा सर्व्हे करण्यात यावा याबाबत आपल्या विभागाला आदेश दिले आहेत.
माळशिरस तालुक्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील 22 गावे नीरा-देवघर प्रकल्पात समाविष्ट आहेत. नीरा देवघर धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालव्याचे काम रखडलेले आहे. नीरा देवघर धरणाचा उजवा कालवा 198 किमी लांबीचा आहे,मात्र आजवर 65 किमी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यापुढील माळशिरस आणि फलटण तालुक्यातील कालव्याचे काम रखडले असल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची झालेली आहे.
शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जेष्ठ नेते,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्र लिहून माळशिरस तालुक्यातील गिरवी, पिंपरी, लोणंद, कण्हेर, इस्लामपूर, रेडे, मांडकी, गोरडवाडी, धर्मपुरी, कारुंडे, मोरोची,नातेपुते, मांडवी, मोटेवाडी, दहिगाव, मोहितेवाडी, फडतरी, गारवाड आदी दुष्काळी गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. त्यासाठी नीरा देवघर कालव्याच्या कामास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.
त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी, निधी उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, स्वतः आढावा घेऊन याबाबत मला अहवाल द्यावा अशी सूचना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, विजयदादांनी आणखी एक पत्र लिहून माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी कोथळे, भांब, जळभावी, पठाणवस्ती, चांदापुरी, पिलीव, सुलेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, तरंगफळ या गावांचा नीरा उजवा कालवा आणि नीरा देवघर कालवा लाभक्षेत्रात समावेश करण्यात यावा, त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीची ही तातडीने दखल घेऊन जयंत पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना सर्व्हेक्षण करण्यात यावे असे आदेश दिले आहेत.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सरकारमध्ये महत्वाचे स्थान असल्याने त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले असल्याने नीरा देवघर कालवा आणि नवीन गावांच्या समावेशाचा सर्व्हे दोन्ही कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.