विठ्ठल सुरू होऊ नये यासाठी काही संचालक प्रयत्नशील

संस्थेविषयी अपप्रचार आणि पैसे मिळू नयेत यासाठी धडपड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असताना काही संचालक मात्र जाणीवपूर्वक यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे समोर येत आहे. कारखान्यास हंगाम सुरू करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत मिळू नये यासाठी हे संचालक प्रयत्नशील असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्याची धडपड करीत असलेले संचालक आणि चेअरमन यांच्या वाटेत काटे अंथरले आहेत असे दिसून येते.

संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे अर्थकारण सुरळीत ठेवण्याची क्षमता असलेल्या, सुमारे 30 हजार सभासद शेतकऱ्यांचा आधार आणि हजारांवर कामगारांच्या रोजी रोटीचा स्रोत असणारा,
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मागील वर्षी पूर्ण क्षमतेने सुरू झाला नव्हता, यंदा तरी सुरू होतो की नाही याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके मे महिन्यापासून यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना संचालक मंडळाने ही संपूर्ण सहकार्य केले आहे. तांत्रिक कारणामुळे राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी आहेत, त्यामुळे इतर बँकांकडून, फायनान्सकडून कर्ज उपलब्ध करण्यासाठी चेअरमन आणि संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातमी

दरम्यान काही बँका, फायनान्स संस्था कर्ज देण्यास अनुकूल झाल्यानंतर काही संचालकांकडूनच संबंधित संस्थाना चुकीची माहिती दिली जाते,आणि कर्ज देण्यास प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली जाते असे समोर आले आहे. त्यामुळे चेअरमन आणि प्रामाणिक प्रयत्न करणारे इतर संचालक हतबल झाले आहेत. आजवर तीन संस्थानी पैसे देण्याची तयारी दाखवली मात्र त्यांना पत्रे लिहून, फोन करून आणि समक्ष भेटून पैसे दिले जाणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली असल्याचे काही संचालकांकडून समजते.

विठ्ठलची तांत्रिक अडचण काहीही उरलेली नाही, संस्थेवर असलेल्या कर्जाची परिस्थिती सुद्धा आवाक्यातील आहे, केवळ हंगाम सुरू करण्यासाठी वेळेवर पैसे मिळाले नाहीत म्हणून मागील 4 हंगामात विठ्ठल अडचणीत येत गेला. या हंगामात ही तीच परिस्थिती निर्माण झाली असून यंदाही वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर कारखाना सुरू होणे कठीण जाणार आहे, सुरू झाला तरी यंत्रणा उभा करणे, पूर्ण क्षमतेने गाळप होणे जिकिरीचे ठरणार आहे.

साखर कारखाना सुरू होण्यासाठी मे पासून संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे, मात्र काही संचालक केवळ संस्था सुरू होऊ नये यासाठी जागोजागी अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे पैसे उभा राहत असताना पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. शिवाय पक्षीय पातळीवर ही तक्रारी करून शासकीय मदत मिळणार नाही, चेअरमन आणि संस्थेबाबत नकारात्मक मत तयार होईल, सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये चेअरमन आणि संचालक मंडळाविषयी अप प्रचार करीत आहेत. त्यामुळे संचालक मंडळा बदनामीपेक्षा संस्थेचे मोठे नुकसान होत आहे.

ही परिस्थिती टाळण्यासाठी संचालक मंडळाने एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असताना काही विघ्नसंतोषी संचालक संस्थेच्या वाटचालीत अडथळे उभा करीत आहेत. व्यक्तिगत राग लोभामुळे हजारो शेतकरी, सभासद, हजारो कामगार यांच्या भवितव्याशी खेळ आहे, याचेही भान या संचालकांना येत नाही असे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!