चौकशी पूर्ण करण्यास समितीला मिळेना मुहूर्त
पंढरपूर : ईगल आय मीडिया
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेच्या वादानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, समितीचे व्यवस्थापक यांच्यासह पूजेच्या वेळी उपस्थित असलेल्या पुजार्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत समितीने गाभाऱ्यात प्रवेश बंदी घातली आहे. मात्र गेल्या 20 दिवसांत ही चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे देवस्थानचा कारभार विठ्ठलाच्या भरवश्यावर चालू आहे.
आषाढी यात्रेनंतर झालेल्या प्राक्षाळ पूजेच्यानंतर मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना गाभाऱ्यातच अंघोळ घातली होती. त्यामुळे मोठा वाद झाल्याने समितीने
या एकूण प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवले आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह त्यावेळी उपस्थित पुजार्यांना गाभारा बंदी घातली आहे. त्यानंतर देवाचे नित्योपचार करणारे नेहमीचे पुजारी यांना मंदिरात जाता येत नाही. नवीन पुजाऱ्यांवर नित्योपचार जबाबदारी दिली असून त्यांच्याकडून नित्योपचार करतेवेळी चुका होत असल्याचे सांगितले जाते. देवाचा पोषाख करण्यापासून ते अंतर्गत सगळी व्यवस्था समितीच्या ‘ त्या ‘ निर्णयानंतर ठप्प झाली आहे. वास्तविक कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांची जबाबदारी मंदिरातील व्यवस्था, परंपरा अबाधित राखण्याची आहे. मात्र समितीने अधिकार नसताना ही कारवाई केली आहे. त्यामुळे मागील 20 दिवस नित्याचे पुजारी, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक मंदिरात जाऊ शकलेले नाहीत. प्रशासन ठप्प झालेले आहे.
15 – 16 तारखेपर्यंत मिटिंग घेऊ
दरम्यान मंदिर समितीचे सहध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, येत्या 15 ते 16 तारखेला समितीची बैठक घेऊ आणि जी काही कारवाई करावी लागेल त्यासंदर्भात राज्य सरकारकडे शिफारस केली जाईल. सध्या देवाचे नित्योपचार व्यवस्थित पणे सुरू आहेत, आज गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाचेही नियोजन परंपरेनुसार करण्यात आले असल्याचेही औसेकर महाराज यांनी सांगितले.
मंदिर समितीने तातडीने चौकशी पूर्ण करून निर्णय घेणे आणि दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असताना चौकशी प्रक्रिया थांबली आहे आणि निर्णय घेतला जात नाही. 30 जुलै रोजी बैठक घेण्याचे निश्चित ठरलेले होते मात्र समितीच्या सन्माननीय सदस्यांना 5 ऑगस्ट पर्यंत वेळ नव्हता म्हणून बैठक पुढे ढकलली गेल्याचे समजते. 11 जुलै उजाडला तरीही मंदिर समितीची बैठक ठरलेली नाही. त्यामुळे प्राक्षळ पूजा प्रकरण कधी संपणार आणि मंदिराचे कामकाज, नित्योपचार पूर्वीप्रमाणे कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.
कारवाईचे अधिकार नाहीत : याचे भान आले पण उशीर झाला !
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक हे शासन नियुक्त आहेत, त्यांची नियुक्ती मंदिर समितीने केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मंदिर समितीला नाहीत. त्याचबरोबर कार्यकारी अधिकारी यांचे म्हणणे जाणून घेणे अवश्यक होते. ते सुद्धा जाणून घेतले नाही. आणि हे चुकीचे असल्याचे मंदिर समितीच्या लक्षात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांच्यावरही गाभारा प्रवेश बंदी घालून समितीने घोषणा केली होती. शासन नियुक्त अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस समिती शासनाकडे करू शकते. कारवाई करू शकत नाही याचे तारतम्यसुद्धा समितीने निर्णय घेताना बाळगले नाही हे दिसून आले. त्यामुळे आता समितीचे सदस्य बचावात्मक पवित्र्यात आले आहेत असेही दिसते.