पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मागील 10 ते 12 दिवस पुणे जिल्ह्यासह घाट माथ्यास झोडपून काढणाऱ्या पावसाने 2 दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उजनी धरणात येणारा विसर्ग ही घटला आहे.तरीही उजनीच्या पाणी साठ्याची वाटचाल साठी कडे सुरू असून पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठा सरासरी 80 टक्के हुन अधिक झाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्या महिन्याभरात मान्सूनने ओढ दिली होती. त्यामुळे जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात ही धरणाची पाणी पातळी गतवर्षी च्या तुलनेत खूपच कमी होती.मात्र जुलै च्या दुसऱ्या पंधरवाड्यात पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांवर झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांची पातळी एकदम वधारली आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील 19 पैकी 6 धरणे 90 टक्के हुन अधिक भरली आहेत. तर 8 धरणांतील पाणी साठा 80 टक्के हुन अधिक झालेला आहे. त्यामुळे सर्व धरणांतील सरासरी 80 टक्के हुन अधिक पाणी साठा झाला आहे. राज्यातील दुसऱ्या सर्वात मोठे धरण असा लौकिक असलेले उजनी धरण सुद्धा आता साठी कडे वाटचाल करीत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उजनीत येणारा विसर्ग घटला असला तरीही 10 हजार क्यूसेक्स च्या जवळपास प्रमाण कायम असल्याने लवकरच 60 टक्के ची पातळी ओलांडून धरण पुढे जाईल अशी शक्यता आहे.
पावसाळ्याचे शिल्लक दिवस आणि परतीच्या मान्सूनची खात्री लक्षात घेता या वर्षी सुद्धा भीमेच्या खोऱ्यातील पाणी साठा समाधानकारक असेल असे चित्र निर्माण झाले आहे.