दिल्लीत काय शिजलं ? सहकार की सहकार्य !

पंतप्रधान मोदी – खा.शरद पवार भेट : चर्चा आणि तर्कवितर्क जोरात

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क आणि विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यात ईडी च्या कारवाईने हैराण असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी ला सहकार्य करण्याची गळ घातली की सहकार कायद्यामुळे येणाऱ्या जाचक निर्बंधावर काही उपाय सुचवले ?याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या भेटीत काय झाले या संदर्भात राष्ट्रवादी चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेउन माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत विशेष करून सहकारी बँकांसदर्भात जे कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत, त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. केंद्राने कायद्यात केलेल्या बदलामुळे सहकारी बँका आहेत त्यांचे अधिकार कुठे ना कुठे मर्यादित करून आरबीआयला जास्त अधिकार त्यामध्ये देण्यात आले. सहकार हा राज्याचा विषय आहे. घटनेत बदल करून याला स्वायत्ततेचा अधिकार दिला गेला. त्यामुळे या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्रकही सादर केलं.

तसेच, काल पीयूष गोयल यांना राज्यसभेत भाजपाचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर, पीयूष गोयल स्वतः शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. नेते पदी निवड झाल्यानंतर ते एक सदिच्छा भेट म्हणून ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. ज्या प्रकारे नेहमीची एक परंपरा राहिलेली आहे की जो सभागृहाचा नेता असतो तो सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन, सहकार्याबाबत चर्चा करतो. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांची पीयूष गोयल यांच्याशी भेट झाली. अशी देखील माहिती मलिक यांनी दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एक बैठक झाली. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी संरक्षणमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांची बैठकीत उपस्थिती होती आणि याच बैठकीत लष्करप्रमुख बिपीन रावत, जनरल नरवणे देखील उपस्थित होते. सीमेवर ज्या प्रकारीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याबाबत सरकारकडून माहिती दिली गेली. याचबरोबर अशी परिस्थिती हातळण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण चर्चा देखील झाली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.


याशिवाय, देशातील करोना परिस्थिती, अनेक ठिकाणी बंद पडत असेली लसीकरण प्रक्रिया या संदर्भातही शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांची दिल्लीत कुठलीही भेट झाली नाही. पंतप्रधान मोदींशी शरद पवारांची भेट होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांना माहिती होतं. असं देखील मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Leave a Reply

error: Content is protected !!