भक्त येणार नसतील तर देवाला 24 तास उभा राहण्याची शिक्षा का ?
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदा आषाढी एकादशीकरीता वारकरी पंढरीत येणार नाहीत, मात्र परंपरेनुसार यात्रा काळात म्हणजेच 25 जूनपासून प्राक्षाळ पूजेपर्यंत देवाला 24 तास उभा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आषाढी, चैत्री यात्रा स्थगित करण्यात आली, शेकडो पालखी सोहळे स्थगित झाले मग भाविक आलेले नसताना देवाला का शिणवता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
यंदाची आषाढी यात्रा अभूतपूर्व स्वरूपाची होत असून अनेक प्रथा, परंपरा बाजूला सारून कोरोनाच्या अवकृपेने यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होत आहे. साडेतीनशे वर्षांच्या पालखी सोहळा परंपरेला ब्रेक लागला आहे, शेकडो संतांचे पालखी सोहळे यंदा पंढरीत येणार नाहीत. तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॉप्टरने आणणार आहेत, पालखी मार्गावरील अनेक प्रथा, परंपरा यंदा खंडित झालेल्या आहेत.
पंढरीची वारी जयाचे कुळी, त्याची पायधुळी लागो मज !
अशा प्रकारची पुण्यवान वारीची परंपरा लाखो वारकरी कुटुंबानी स्थगित ठेवली आहे.
या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू ठेवण्याची परंपरा पाळण्याच्या नावाखाली रिकाम्या गाभाऱ्यात देवाला 24 तास उभं राहण्याची जणू शिक्षाच ठोठावली आहे. 28 युगे विटेवर उभा असलेल्या देवाला भाविकांना दर्शन देण्यासाठी उभा राहिल्याने शिणवटा येतो. त्यानुसार दररोज रात्री 11 वाजता शेजारती झाल्यानंतर देव झोपी जातो. देवाला प्राक्षाळ पूजे दिवशी शिणवटा घालवण्यासाठी काढा दिला जातो. हे सगळं परंपरा म्हणून आजवर चालत आले. लोकांनीही त्याबाबत कधी तक्रार केली नाही, असण्याचे कारणही नाही. प्रत्यक्ष पायास हात लावून दर्शन देणारा विठोबा एकमेव देव आहे. त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकास दर्शन व्हावे म्हणून यात्रेच्या काळात देवाला झोपू दिले जात नाही. शेजारतीचे नित्योपचार बंद करून देव 24 तास उभा राहतो.
मात्र यंदाच्या आषाढी यात्रेसाठी वारकऱ्यांनी येऊ नये असे आवाहन शासनाने केले आहे. जरी कोणी यायला लागले तर त्याला रोखण्यासाठी त्रिस्तरीय नाकाबंदी केली आहे. त्यामुळे यंदा पंढरीत वारकरी येणार नाहीत. तेव्हा देवाला 24 तास का उभा करायचे ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
अनेक परंपरा मंदिर समितीने बाजूला केल्या आहेत, तशीच अगदी अलीकडच्या काळात लागू झालेली ही परंपरा यंदाच्या वर्षकरिता स्थगित करून देवाला 24 उभा न करता नित्योपचार सुरू ठेवले जावेत अशी अपेक्षा सामान्य भाविक करू लागले आहेत.
भाविक पंढरीत येणार नाहीत, दर्शन रांग रिकामी असले मग देव कुणासाठी उभा राहील ? Online दर्शन 24 तास सुरू ठेवण्याचा समितीचा दावा निरर्थक आहे, रात्री 12 वाजता, मध्यरात्री 1 वाजता आणि पहाटे 2 -3 वाजता कोण उठून online दर्शन घेईल ? प्रत्यक्ष भक्त आलेले नसताना आभासी भक्तांसाठी देवाला 24 तास का उभा करता ? असा सवाल उपस्थित होत असून मंदिर समितीने यंदाच्यापुरती ही परंपरा स्थगित ठेवावी आणि विठू माऊलीस शेजारती नंतर निद्रेस जाण्याची ” परवानगी ” द्यावी अशी मागणी भविकातून होत आहे.
परंपरा मोडता येत नाही, यावर्षी ही परंपरा खंडित केली तर पुढच्या वर्षी पुन्हा सुरू करताना नवीन वाद निर्माण होईल. त्यामुळे परंपरेनुसार देवाचा पलंग काढण्यात आलेला आहे. आणि online 24 तास दर्शन सुरू केले आहे.
– ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
सहध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
पांडुरंगाला ही शिक्षा का?
यंदाची आषाढी यात्रा कोरोनाच्या परिस्थिती मुळे भाविकांच्या अनुपस्थित पार पाडली जाणार आहे. तरीही देवाचा पलंग परंपरेने काढला जाणार असल्याने देवाला भाविक नसतानाही चोविस तास उभे रहावे लागणार आहे. आणि ही एक प्रकारची देवाला शिक्षाच दिल्यासारखे होणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांमधे नाराजी पसरली आहे.
तसे पाहिले तर पलंग काढणे ही सुरुवाती पासून ची परंपरा नाही. काळाप्रमाणे भाविकांची गर्दी वाढू लागलेने, भाविकांचे झालेले हाल देवाला आवडणार नाहीत म्हणून भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी ही परंपरा सुरु केली आहे. तसे पाहिले तर मंदिर समिती आल्या पासुन अनेक परंपरांना फाटा देण्यात आला आहे.
त्यामुळे पलंग काढण्याची परंपरा यावेळेस बंद करून देवावर होणारा अन्याय दूर करून भाविकांच्या भावनांची समितीने दखल घ्यावी एवढीच विनंती ! – भारत देसाई, जेष्ठ पत्रकार
नामदेव पायरीपासून दर्शन रांगेची परंपरा मोडलीच कि
वारकरी संप्रदायातील समजुतीनुसार विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांग संत नामदेव पायरीवरून चालत असे. मात्र १९८२ च्या सुमारास हि परंपरा खनदीत करून आता भाविकांची रांग दर्शन मंडपातून सेतूवरून थेट मंदिरात उतरवली जाते. अशा अनेक परम्परा बदलल्या आहेत, यंदाच्या पुरती देवाला २४ तास उभा करण्याची परंपरा स्थगित करण्यास काय हरकत आहे ?– मोहन अनपट ,
जिल्हाध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल