वाघोलीच्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराची गगनाला गवसणी
माळशिरस : ईगल आय मीडिया
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल आज 4 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये वाघोली ( ता.माळशिरस ) येथील शेतकरी कुटुंबातील युवक सागर भारत मिसाळ याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधूम वायच्या 24 व्या वर्षी सुयश संपादन केले आहे.
अतिशय कमी वयात सागरने हे यश मिळत संपूर्ण देशातून 204 व्या रँकने सागरने केंद्रीय स्पर्धा परीक्षेत यशाची पताका फडकविल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे .
सागरचे प्राथमिक शिक्षण वाघोली येथील जि.प.शाळेत , माध्यमिक शिक्षण विजयसिंह मोहिते- महाविद्यालय वाघोली तर उच्च माध्यमिक शिक्षण स. मा .वि .अकलूज येथे झाले. त्याने इ. चौथी व इ. सातवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळविला होता. बीएससी ऍग्री शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर यूपीएससीसाठी त्याची विशेष शिष्यवृत्तीमधून निवड झाली होती. सागरचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी तर आई ही गृहिणी आहेत.
यूपीएससीच्या लेखी परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आल्या होत्या. तर फेब्रुवारी -ऑगस्ट 2020 च्या दरम्यान व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली होती. त्याचा अंतिम निकाल मंगळवारी ( दि 4 ऑगस्ट ) रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या एकूण 829 उमेदवारांची विविध पदांवरील नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. गुणवत्तेनुसार उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा ,भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा ग्रुप ए आणि ग्रुप बी या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे .
सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील, जिल्हा परिषद शाळेत शिकलेला सागर 24 व्या वर्षी आय ए एस झाल्याने त्याचे कौतुक होत आहे.
जिद्द आणि परिश्रम हेच यशाचे रहस्य ! अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत ,जिद्द, परिश्रम करावे लागतात. मला माझ्या घरच्यांबरोबर गुरुजनांची ही मोठी साथ लाभली, याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा मला लाभ मिळाला असुन शासन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी सहकार्याच्या भूमिकेत असते. ग्रामीण भागातील मुलांनी आपल्यामध्ये कधीच उणीव न बाळगता जिद्द परिश्रम आणि कठोर मेहनत घेतल्यास यश मिळते. – सागर मिसाळ, नूतन आयएएस अधिकारी.