राज ठाकरे यांचे अज्ञान

संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते हर्षल बागल यांचे टीकास्त्र

टीम : ईगल आय मीडिया

राजकिय, सांस्कृतिक , सामाजिक चळवळीचे राज ठाकरेंचे अज्ञान…
राज ठाकरे यांनी ब.मो. पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्यात जेम्स लेनवरिल केलेल्या वादग्रगस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड या संघटनेने राज्यभरात तीव्र शब्दात संतप्त होत निषेध व्यक्त केला . अगदी राज यांनी आपण प्रबोधनकारांचे नातु की पुरंदरेचे नातु ते स्पष्ट महाराष्ट्राला सांगावे असा सुर पुरोगामी चळवळीतुन निघाला .

महाराष्ट्रात जिजाऊ शिवराय यांच्या चरित्रावर काहीही झाले तर त्याचे पडसाद पहिल्यांदा सोलापुर जिल्ह्यात व नंतर राज्यात ऊमटतात . यावेळी देखील राज ठाकरे यांच्यावर सोलापुरातुनच आरोप प्रत्यारोप झाले. पण वास्तव आपणही समजुन घेतले गेले पाहिजे. नक्की जातीपातीची मुळे कधी व कोणी लावली. खरच राजकीय सामाजिक व सांस्कृतिक या चळवळीचे न्यान राज यांना आहे का हे देखील वास्तव तपासले पाहिजे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक येथील प्रस्थापित ब्राम्हण वर्गाने नाकारला त्यानंतर राज्याभिषेकास कायस्थांनी व गोसावींनी समर्थन केले . छत्रपती संभाजी राजे यांना ज्या पध्दतीने औरंगजेबने शिक्षा दिली ती इस्लाम धर्मातील कायद्यानुसार नव्हती तर ती मनुस्मृती कायद्यानुसार होती याचाही विसर पुरंदरे व राज पडलेला दिसतोय.

१९०२ साली छत्रपती राजर्षी शाहु महाराजांना वेदोक्त प्रकरणात झालेला त्रास मिळालेली वागनुक ही जातीय दृष्टीकोनातुनच होती. अगदी स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना देखील जातीयवादाने सोडले नाही. खुद्द प्रबोधनकार केशव ठाकरे यांना पुण्यातील ब्राम्हणवर्गाने हाकलुन दिले होते हा देखील इतिहास त्यांना माहित नसावा. पण ब्राम्हण विरुध्द मराठा हा वाद नाही तर ब्राम्हणी विचार सरणीविरुध्द बहुजन असा वाद होता. हा वैचारिक संघर्ष शिवशाही पासुन आजपर्यंत आहे.


२००३ मध्ये जेम्स लेनच्या लिखाणानंतर महाराष्ट्रात शिवप्रेमींचा विरोध सुरु झाला. जेम्स लेनला विकृत लिखाणासाठी मदत केल्याच्या रागातून पुण्यात शिवसेनेच्या निष्ठावान शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी श्रीकांत बहुलकारांना काळे फासले. तेव्हा शिवसेनेविषयी शिवप्रेमींना एक आस्था निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी सेनेत असणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्याला येऊन हात जोडून बहुलकरांची माफी मागितली. शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष रामभाऊ पारेख यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला. राज ठाकरेंच्या या वैयक्तिक भूमिकेमुळे शिवसेनेला अनेक कार्यकर्त्यांची नाराजी घ्यावी लागली होती.

राज ठाकरेंनी कधीतरी पुरंदरेंना आपण सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेत जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला होता आणि तुमच्या “पुरंदरे प्रकाशन” या संस्थेने जेम्स लेनच्या पुस्तकाचे वितरक म्हणून काम केले होते का हे प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे. हे जमणार नसेल तर निदान आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या इतिहासलेखनाबाबत काय मते नोंदवली आहेत याचा तरी अभ्यास राज यांनी करायला हवा.

१८९९ चे वेदोक्त प्रकरण ते १९९९ ची राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या दरम्यानचा काळ शंभर वर्षांचा आहे. या शंभर वर्षांच्या काळात झालेल्या मूळ सांस्कृतिक संघर्षाकडे दुर्लक्ष करुन राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीचा मुद्दा मोठा झाला असे विधान करुन भलताच संघर्ष निर्माण करु पाहत आहेत. खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडून शरद पवारांवर टीका करुन त्यांची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

राज ठाकरेंनी राजकीय स्वार्थासाठी पवारांवर टीका करुन दिशाभूल करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतराचा थोडासा अभ्यास केला तर अनेक गोष्टींचा त्यांना उलगडा होईल. राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या अनेक वर्ष आधीच भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात जातीच्या मुद्द्याला जन्म घातला आहे. भाजपने माधवं या राजकीय सूत्राचा अवलंब करुन राज्यात विभागवार माळी, धनगर, वंजारी समाजातील नेतृत्वं उभी केली आणि त्यांच्या आडून “मराठा वगळून राजकारण” हा डाव खेळला.अर्थातच हा सगळा आरएसएस आणि पर्यायाने ब्राह्मणी मेंदूतून आलेला राजकीय विचार होता.

राजकारणाच्या माध्यमातून जातीय संघर्षास खो घालणाऱ्या भाजपच्या त्या नितीविषयी राज ठाकरे कधी बोललेले दिसून येत नाहीत. १९८० नंतर महाराष्ट्रात मंडल कमिशनला विरोध करुन उभा केलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, नामांतर प्रकरणात उभा केलेला मराठा विरुद्ध दलित संघर्ष, हे जरी राजकीय स्वरुपाचे असले तरी त्यात जातीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. राज ठाकरे या इतिहासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. असे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी आरोप राज यांच्यावर केले आहेत. अद्याप राज यांनी या आरोपांना ऊत्तर न देता कालच्या पत्रकार परिषदेत पुन्हा मुळ प्रश्नांना बगल दिली आहे.


राज यांना प्रविण गायकवाड असेही म्हणतात की राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.

ठीक आहे, परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की.


भाजपाने नेहमीच जातीय सोशल इजिंनिअरिंग केले. गोगपिनाथ मुंढे यांनी मराठा राजकीय नेतृत्वाला सुरुंग लावण्यासाठी मराठ्यांच्या विरोधात माळी धनगर वंजारी असा माधव नावाचा पँटर्न निर्माण केले नाही पण त्यास फारसे यश आले नाही. त्यानंतरही भाजपाने सतत जातीय अंजेढे निर्माण केले. महापुरषांच्या अस्मितेचे राजकारण भाजपाशिवाय दुसऱ्या कोणत्याच पक्षाला आजपर्यत जमले नाही.

धर्मांद व जातीय वक्तव्ये ही भाजप प्रवक्त्यांची खासियतच आहे. राज ठाकरे यांनी भाजपाच्या पितृसत्ता असलेल्या संघाच्या प्रमुख पदावर इतर दलित बहुजन जातीचे धर्माचे चेहरे कधीच का दिसले नाहीत ते विचारायचे धाडस राज यांनी केले तर बरे होईल.
या ऊलट राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर एकदा विधीमंडळात दिवगंत गृहमंत्री आर आर पाटिल यांनी स्वता भाषणात सागिंतले की राज्यात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या प्रबोधनामुळे जातीय धार्मीक दंगली कमी झाल्या हा गुप्तचर संघटनेचा अवहाल आहे, असे आर आर पाटिल म्हणाले होते. त्यामुळे राज यांच्या दाव्यात किती सत्यता आहे हे दिसुन येते. राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे किती अज्ञान आहे हे देखील स्पष्ट दिसत आहे.

लेखक : हर्षल बागल,

कुर्डुवाडी, ता. माढा
लेखक हे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!