भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिका 3-1 ने जिंकली
टीम : ईगल आय मीडिया
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळून भारतीय संघाने मालिका ३-१ने जिंकली. वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार नाबाद ९७ धावा आणि फिरकीपटूंची धमाकेदार कामगिरी लक्ष्यवेधी ठरली. दुसऱ्या डावात आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या.
कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या ७ बाद २९४ धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल मैदानावर होते. या दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला पहिल्या डावात १५०च्या पुढे आघाडी मिळून दिले. पटेल अर्धशतकाच्या आणि सुंदर शतकाच्या जवळ आला असता ही जोडी फुटली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पटेल ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा शून्यावर बाद झाला आणि त्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद करत बेन स्टोक्सने भारताचा ३६५ धावांवर ऑल आउट केला.
भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद १० अशी केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तर अश्विनने पुन्हा एकदा बेन स्टोक्सला बकरा केले. त्याने स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवत इंग्लंची अवस्था ४ बाद ३० अशी केली.
चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर भारतीय संघाने धमाकेदार कमबॅक केले. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत मोठा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अहमदाबाद येथील डे-नाइट कसोटीत इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी पराभव करत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज चौथ्या कसोटीत विजय मिळवून या दौऱ्यातील पहिल्या मालिकेत विजय मिळवला.