आट्या – पाट्याचे ऑलिम्पिक यंदा खंडित !

73 वर्षांनंतर गादेगाव ची आट्या पाट्या स्पर्धा रद्द

पंढरपूर : ईगल आय मीडिया

देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसोबत सुरू झालेली गादेगाव ( ता. पंढरपूर ) येथील आट्या पाट्या स्पर्धा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे. आट्या पाट्या स्पर्धेचे लॉर्ड्स किंवा ऑलिम्पिक म्हणून या गावातील स्पर्धेला ओळ्खले जात होते. मात्र यंदा येथील स्पर्धा खंडित होऊन पारंपरिक मैदान 15 ऑगस्ट रोजी ओस पडलेले दिसणार आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असतानाच अनेक नवी क्षितिजे उजळून निघत होती. पारतंत्र्यात मर्यादा असल्याने स्वातंत्र्य मिळताच अस्सल देशी प्रथा, परंपरा, क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्रात नवीन उत्साह संचारला होता आणि नव्या जोमाने , नव्या उत्साहाने त्या पुढे चालवल्या जात होत्या.

क्रिकेट, टेनिस सारखे ” भाव ” खाऊ खेळ आज लोकप्रिय असले तरी भारतात देशी खेळाला मोठी परंपरा आहे आणि हे खेळ लोकप्रिय सुद्धा होते. आट्या-पाट्या हा एक क्रीडा प्रकार महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय होता. पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात हा मैदानी आणि मर्दानी खेळ आजही खेळला जातो मात्र त्याला खूप मर्यादा आलेल्या आहेत.

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव असंच क्रीडा प्रेमी गाव. या गावाने आट्या – पाट्या क्रीडा प्रकार नुसताच जपला नाही तर त्याचा प्रसार करण्याचा, त्याला लोकाश्रय देण्याचा प्रयत्न केला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गादेगावचे योगदान मोठे आहे. देशभक्त बाबुराव बागल यांच्या नेतृत्वाखाली गावातील त्यावेळच्या युवकांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या या योगदानाची महती महात्मा गांधींच्या कानी पडली होती आणि खुद्द महात्मा गांधी गावात येऊन गेले. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी गाडेगावच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याचे कौतुक करून गावाला भेटी दिलेल्या आहेत.

अशा संपन्न, समृद्ध वारसा असलेल्या गाडेगावात स्वातंत्र्य दिनादिवशी आट्या -पाट्या स्पर्धेला 1947 साली सुरुवात झाली. तशीही आट्यापाट्याच्या सामन्याला सुरवात तस स्वातंत्र पूर्व काळात कै. बाबूरावजी बागल यांनी केली. लोक जमवुन महात्मा गांधी यांचे विचार त्यांच्या समोर मांडून स्वातंत्र संग्रामात सहभागी करून घेण्यात त्यांचा प्रयत्न असायचा. श्रावण महिन्यात दर सोमवारी गावात सामने होत. त्यात आकर्षक बक्षिसे देण्यात येत. लोकाना खेळाची आवड निर्माण झाली. त्याकाळातील जुनी – जाणती खेळू लागली. त्यांनी तरुणांनाही सहभागी करून घेतले. 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, आणी मग 15 ऑगस्ट ही तारीख आट्यापाट्या सामन्या साठीच निश्चित झाली.

ती परंपरा आजतागायत चालू आहे.परंतु यंदा कोरोना जागतिक महामारीमुळे ही परंपरा खंडित होत आहे.
गावातील हे स्पर्धा टिकून राहण्यासाठी संपूर्ण गाव एकदिलाने प्रयत्न करीत आहे.
सदाशिव जगताप, उद्धव पवार, तुकाराम कांबळे, भानुदास सावंत, पांडुरंग बागल, पैगंबर मुलाणी, बुवा मोरे, विजय फाटे, स्वामी बागल, तुकाराम कांबळे, प्रकाश सावंत, भागवत बागल, सदा जगताप यांनी गादेगाव च्या संघ उभारणीत मोठे योगदान दिले. एवढेच नाही तर या स्पर्धेचा लौकिक राज्यभर पोहोचला होता. त्यामुळे ही स्पर्धा जिंकायची म्हणून अगोदर महिनाभर अनेक गावांत आट्या पाट्यांचे सराव चालायचे. म्हैसगाव, भुताष्टे, वडणेरे, भोसरे, वाडीकुरोली, बावी, लवंग, घरनिकी, तावशी, मरापूर, येद्राव, अनवली, कौठाळी, यासह सातारा, पुणे जिल्ह्यातील संघ सहभागी होत असायचे.गावात दोन, तीन दिवस हे सामने चालायचे आणि ते बघण्यासाठी राज्ययभरातून क्रीडा प्रेमी यायचे.

गादेगावचे मैदान आट्या पाट्याचे ऑलिम्पिक म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि कोणतेही वाद ,विवाद न होता, कोणत्याही राजाश्रयाशिवाय ही स्पर्धा गेली 73 वर्षे अखंडित चालू राहिली. या दरम्यान अनेकवेळा राजकीय, नैसर्गिक संकटे आली तरीही स्पर्धा सुरूच राहिली. मात्र यंदा कोरोना जागतिक महामारी मुळे हे मैदान भरणार नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसोबत सुरू झालेली ही अस्सल मराठमोळी क्रीडा स्पर्धा यंदा मात्र खंडित झालेली आहे. ही स्पर्धा खंडित होणे ग्रामस्थांसाठी दुःखद आहे.

मात्र तरीही पुढच्या वर्षी पासून नव्या जोमाने स्पर्धा भरवूयात असा निर्धार करून यंदा आट्या पट्याचे हे ऑलिम्पिक मैदान खंडित झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!