4 थी क्रिकेट कसोटी मालिका 2 विरुद्ध 1 अशी जिंकली
टीम : ईगल आय मीडिया
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला असून, चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने 3 विकेटनी विजय मिळवत मालिका २-१ अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली. ऋषभ पंत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने कालच्या ४ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. टीम इंडियाला विजयासाठी ३२४ धावांची गरज होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात होते. पॅट कमिन्सने रोहित शर्माला ७ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजार आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी ११८ धावा केल्या. पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. तर गिलने धावा काढण्याची संधी सोडली नाही. गिल कसोटीतील पहिले शतक झळकावेल असे वाटत असताना नॅथन लायनने त्याला ९१ धावांवर बाद केले.
गिलच्या जागी आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघ विजयासाठी खेळणार असल्याचा मेसेज ऑस्ट्रेलियाला दिला. पुजारा सोबत त्याने धावांचा वेग वाढवला. पण त्या प्रयत्नात रहाणे बाद झाला. त्याने २२ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर मयांक अग्रवालच्या जागी ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. भारताच्या या फलंदाजीतील बदलावरून संघ विजयासाठी मैदानात उतरला आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पंतने पुजारा सोबत ६१ धावांची भागिदारी केली.
ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेतल्यानंतर कमिन्सने पुजाराला ५६ धावांवर बाद केले. पुजाराच्या जागी आलेल्या मयांक अग्रवालने पंतसह पाचव्या विकेटसाठी ३७ धावांची भागिदारी केली. कमिन्सने अग्रवालला ९ धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला.
अभिनंदन टीम इंडिया 🌷🌷