भारताचे ऑलिम्पिकमध्ये पहिले सिल्व्हर

मीराबाई चानु ने वेटलिफ्टिंग सिल्व्हर जिंकले

टीम : ईगल आय मीडिया

टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे . टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते. त्यानंतर मीराबाईनं टोकयोमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे.

चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले.

चानू यावेळी 49 किलो वजनी गटामध्ये सहभागी झाली होती. पाच वर्षांपूर्वी रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही मीराबाईकडून पदकाची मोठी अपेक्षा होती. त्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनं निराश केलं होतं. त्या स्पर्धेत तिला सहा प्रयत्नात फक्त एकच वेळी वजन उचलण्यात यश मिळाले होते.

भारताकडून करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकले होते. मल्लेश्वरीनं सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!