लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडचा धुव्वा !
टीम : ईगल आय मीडिया
लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत मात केली आहे. या विजयाबरोबर भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 120 धावांवर गुंडाळून टाकली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.
भारतातर्फे मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माने दोन आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.
कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.
तत्पूर्वी आज उपाहारापर्यंत भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला. भारताने सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले. रॉबिन्सनने त्याला बाद केले. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. त्यानंतर शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले.
डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.