बॅडमिंटनपटू सिंधूनं जिंकलं कांस्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक

टीम : ईगल आय मीडिया

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावे आणखी एक पदक जमा झाले असून आज ( रविवारी ) झालेल्या बॅडमिंटन मध्ये झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत पी. व्ही.सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५  असा पाडाव केला आणि भारताला कांस्यपदक मिळवून दिले. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले. या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते, तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.
 

हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूविरुद्धच्या दुसऱ्या गेममध्ये बिंग जिआओनेही पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सिंधूने मात्र कमी चुका करून आघाडी कायम राखली आणि जिआओने पुन्हा ११-११अशी बरोबरी साधली पण विश्वविजेत्या सिंधूने १६-१३ अशी आघाडी वाढवली आणि विजयासह भारतासाठी एका पदकाला गवसणी घातली.

Leave a Reply

error: Content is protected !!