शैक्षणिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे अभिनव पाऊल
टीम : ईगल आय मीडिया
कोरोनामुळे सध्या आपले जग बंदिस्त झाले असताना उद्याचे जग आणि उद्याचे शिक्षण कसे असेल यासाठी अभिनव उपक्रम महाविकास आघाडी सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणत , ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकले आहे.
महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या गूगल क्लासरूम प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी झाले होते.
हे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त करत मा. मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला ‘जी स्वीट’ आणि राज्य शाळांकरिता सुरु केलेला ‘गुगल क्लास’ रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात, कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा विद्यार्थ्यांना योग्य वापर करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.