इंजि. गणेश अटकळे, सॉफ्टवेअर अभियंता,
इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे पेगासस स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर भारतातील प्रमुख राजकीय नेते, दोन केंद्रीय मंत्री, काही पत्रकार यांच्या मोबाईल मध्ये टाकले असून त्याद्वारे त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाल्याचे बोलले जात आहे. हे पेगासस स्पायवेअर काय आहे आणि ते कसे काम करते ते आपण जाणून घेऊयात.
पेगासस स्पायवेअर हे इस्रायलच्या NSO ग्रुपने तयार केलेलं ap आहे. 2016 मध्ये ही कंपनी चर्चेत आली कारण त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आला. त्याला हे वाटत होते की पेगाससद्वारे आयफोन युजर्सचे फोन हॅक केले जातायत. मात्र वर्षभरानंतर पेगासस स्पायवेअर हे अँड्रॉईड फोनही सहज हॅक करू शकतं असं समोर आलं.
ज्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा आहे त्याला एक वेबसाईटची लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन झाली की पेगासस त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं. शिवाय व्हॉईस कॉल सिक्युरीटी बग आणि व्हॉट्सएप यांच्या माध्यमातूनही पेगासस इन्स्टॉल केलं जाऊ शकतं.
पेगाससची सिस्टिम इतकी एडवांस आहे की युजरला मिसकॉल देऊन सुद्धा त्याचा फोन हॅक करता येऊ शकतो.
संशोधकांच्या सांगण्याप्रमाणे, युझरच्या मोबाईलवर इन्स्टॉल झालं की त्याचे कॉल लॉग, व्हॉट्सएप चॅट पाहता येतात. व्हॉट्सएपचे मेसेज वाचणं, कॉल ट्रॅक करणं, युझरची अॅक्टिव्हिटी पाहणं या सगळ्या गोष्टी या पेगाससमुळे सहजरित्या केल्या जाऊ शकतात.
सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. फेसबुकने देखील NSO ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. फेसबुकच्या सायबर सुरक्षेविषयी संशोधन करणारे संशोधक Pegasus काय करतं आहे, याची माहिती वारंवार घेत होते. तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की, पेगाससद्वारे भारतातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे WhatsApp हॅक करण्यात आले होते.