कोयना धरणापासून सुमारे 20 किलोमोटरवर भैरव गडाच्या अगदी जवळ, चाहुबाजूने जंगलाने वेढलेलं पाथरपुंज हे गाव. पाटण तालुका, सातारा जिल्ह्यातील छोटंस आणि दुर्गम भागातील शेवटचं गाव. गाव म्हणावं तर आपल्याकडच्या वस्त्या यापेक्षा मोठ्या असतात, जेमतेम 50 ते 60 घराचं हे चिटूकल गाव मोठ्या धाडसान आपल्या मूळ जागी बसून आहे. वनविभाग या गावाला हलवण्याचा प्रयत्नात आहे मात्र हे गावकरी इथून हलायला तयार नाहीत. गावातील घरटी सर्वच युवक सातारा, पुणे,मुंबईत रोजगारासाठी गेलेले आहेत. सुट्टी, पारंपरिक सण, लग्न, उत्सवाच्या निमित्ताने गावाकडं ही युवक मंडळी येतात खरी मात्र त्यासाठी त्यांना तळोशी पासून सुमारे 15 किलोमीटर ची घनदाट जंगलातील, खाच खळग्याची वाट तुडवत जावे लागते. एखादा माणूस आजार पडला तर त्याला डालग्यात बसवून किंवा झोळीत दोघांच्या खांद्यावरून 20 किमी दूर कोयनानगर ला आणावं लागतं. या परिसरात गव्या ची मोठी दहशत आहे. एकटा, दुकटा गवा असेल तर पळून जातो. मात्र दोन चार गव्यांची टोळी असेल तर हल्ला बोल केल्याशिवाय राहत नाही. आजवर गव्याच्या हल्ल्यात काही पर्यटक दगावले आहेत. जवळपास 7, 8 किलोमीटरवर दुसरं छोटंस ही गाव नाही, रस्ता नाही, मोबाईलला रेंज मिळत नाही. गावात वीज पोहोचलेली असली तरीही रस्त्याआभावी st मात्र येऊ शकत नाही. या गावातील लोकांची 5, 10 एकर प्रत्येकाची शेती आहे मात्र गवे पीक ठेवत नाहीत म्हणून शेती पिकवत नाहीत. या गावातील तसे खूप भोळे, आपल्याच विश्वात रममाण झालेले दिसून येतात. गावात सातारा जिल्हा परिषदेची 7 वी पर्यंत ची शाळा आहे परंतु शिक्षक आठवड्यातून 2 दिवस येतात. म्हणून मग शाळा असूनही गावातील मुलं सातारा, कराड, पाटण इथं शिकायला पाठवली जातात. सुट्टी असल्यामुळं आता गाव बाल गोपालाणी गजबजलेलं आहे. घराच्या अंगणात गोट्या, गजगे, फुगड्यांचे खेळ रंगलेले दिसतात तसेच शेजारच्या मोकळ्या मैदानात 8, 10 पोरं क्रिकेट खेळताना दिसून येतात. आता गावाला पावसाचे वेध लागले आहेत. जणू काही गावात एखादं मंगलकार्य आहे, एखादा उत्सव आहे अशा उत्साहात गावकरी पावसाळ्या अगोदर करावयाच्या तयारीला लागले आहेत. वर्षातील 5 महिने संततधार पाऊस असतो, त्यामुळं आता या गावचे लोक घरांची शाकारनी, प्लॅस्टिक कागद बांधणे, लाकूड फाटा भिजू नये म्हणून सुरक्षित ठेवण्याच्या कामाला लागले आहेत. पावसामुळे घराच्या भिंतींना नुकसान होउ नये म्हणून घराभोवती झाड पाल्याचा कुड उभा केला जात आहे. प्रत्येक घरापुढं प्रशस्त अंगण, अंगणात जनावरांना ही सुरक्षित जागा, शेणामातीने सारवलेली घरं आणि अंगण तुळतुळीत आणि चकचकीत स्वच्छ दिसतात, गावासाठी एक विहीर आहे या विहिरीचं पाणी आटत नाही, संपूर्ण गाव 12 महिने तेच पाणी पिते. भैरव गडापासून खाली पाहिलं की कोकण दिसतो आणि पाथरपुंज हे या कड्यावरील शेवटचं गाव. जणू काही कोकणाच्या डोक्यावर बसलेल आहे. या गावातील zp च्या शाळेत आम्ही जाणीवपूर्वक मुक्काम केला, निरव शांतता, गव्यांची ऐकीव दहशत, पक्षांचा किलबिलाट आणि बाजूची झुडतील काजव्यांच्या चमचमाट आमची 23 मे ची रात्र संस्मरनिय करून गेला. कोकणाच्या डोक्यावर बसलेलं पाथरपुंज गाव आमच्या मनात बसलं ! तुम्ही पण एकदा जाऊन या.
go to this link and watch the vdo