पंढरपूर : इगल आय मिडिया
लॉकडाऊनमुळे परराज्यात व परजिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी व येण्यासाठी शासनाने कार्यपध्दती जाहीर केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडकलेले नागरिक, विद्यार्थी मजूर आदी स्वगृही परत येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत तालुक्यात स्वगृही परतलेल्या शहरी व ग्रामीण भागातील 5 हजार 300 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अडकलेले नागरिक स्वगृही येत आहेत. परराज्यातुन तसेच इतर जिल्ह्यातून तालुक्यात आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येत आहे. येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना आरोग्य विभगाच्या सूचनेनुसार गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांनी गृह विलगीकरणाचे पालन करावे. या नागरीकांवर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती व शहरी भागात वार्डस्तरीय समिती लक्ष ठेवत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करुन माहिती संकलित करण्यात येत असल्याचेही श्री.ढोले यांनी सांगितले.
परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाचे पुर्ण लक्ष असून, नागरिकांनी अनाधिकृतपणे तालुक्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची माहिती तात्काळ ग्रामस्तरीय समिती व वार्डस्तरीय समितीला द्यावी असेही श्री.ढोले यांनी सांगितले.