पंढरपूर.दि.21 :
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अडकलेले बिहार येथील 1 हजार 310 नागरिक पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वेने बिहार येथील सहारसा येथे रवाना करण्यात आले.
पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन आज दुपारी 2.00 वाजता बिहारकडे 1 हजार 310 नागरिक रवाना करण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, वरीष्ठ अभियंता आर.एस गव्हाणे , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर स्थानकात सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रशासनाकडून रेल्वेमध्येच पाणी व फुड पॅकेटची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात सामाजिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पुर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकात संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. सदर रेल्वे बिहारमधील सहारसा येथे शनिवारी रात्री 11.10 वाजता पोहचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या बिहार राज्यातील 1 हजार 310 नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील पंढरपूर 343, बार्शी 93, माढा-268, बार्शी-93, करमाळा-102,माळशिरस-96, सांगोला-328, मंगळवेढा-80 येथील 1 हजार 310 नागरीकांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन रवाना करण्यात आले.