पंढरपूर : ईगल आय मीडिया
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराबरोरच ग्रामीण भागातील मठ आणि धर्मशाळेमध्ये बाहेरील वारकरी व नागरिक येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत , कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील मठांची व धर्मशाळेची माहिती संकलित करावी. तसेच बाहेरुन येणारा कोणताही नागरिक वास्तव्यास येणार याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
आषाढीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकित गुप्ता, नायब तहसिलदार सुरेश तिटकारे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे , मंडलाधिकारी समिर मुजावर, संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रांतधिकारी ढोले बोलताना म्हणाले , पंढरपूर तालुक्यातील खर्डी, वाखरी, शेगांव दुमाला, भंटुबरे, कौठाळी, शिरढोण, कोर्टी, टाकळी व इसबावी गावांमधील मठांची व धर्मशाळेची माहिती संकलित करावे तसेच तेथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तींची संख्या यांची माहिती संबधित ग्रामपंचायतीने संकलित करुन, सध्या बंद असणारे मठ व धर्मशाळा उघणार नाही यांची दक्षता घ्यावी. यासाठी ग्रामसतरीय समितीने दक्षता घेवून योग्य ते नियोजन करावे. जेणे करुन बाहेरील नागरिक येणार नाही व आपले गांव कोरोना संसर्गापासून मुक्त राहील.
लॉकडाऊनमुळे पररराज्यातून व परजिल्ह्यातून पंढरपूरात स्वगृही आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथके तैनात आहेत. तसेच तालुक्यात आरोग्य विभागाकडून आवश्यकती खबरदारी घेतली जात आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समिती व वार्डस्तरीय समितीने प्रशासनाच्या सूचनेनुसार बाहेरुन आलेल्या नागरिकांचे योग्य नियोजन केल्यामुळे तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.