पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या दोन वर्षांपासून अनेकवेळा आंदोलने, चर्चा करूनही एन.टी.पी.सी.कडून कोणत्याही प्रकारचा समाधानकारक मार्ग काढला जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी पंढरपूर तालुक्यातील एन.टी.पी.सी.चे 17 टॉवर्स रात्रीतूनच जमीनदोस्त केले आहेत. हे टॉवर्स नेमके कुणी पाडले हे स्पष्ट झालेले नसले तरी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकर्यांनीच हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान शेतकर्यांच्या या कारवाईमुळे एन.टी.पी.सी.चे मात्र करोडो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर येथील एन.टी.पी.सी.च्या प्रकल्पातून इंदापूर आणि बारामती कडे वीज वाहिनीचे भले मोठे टॉवर्स उभा करण्यात आलेले आहेत. टॉवर्सवर लाईन्सही टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र या टॉवर्स लाईनमुळे त्या मार्गावरील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतात अनेक टॉवर्स उभा राहिलेले आहेत. अनेकांच्या घरावरून लाईन गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणे शेतकर्यांना अवघड झाले आहे. जमीनी कसणे जिकीरीचे होऊन बसलेले आहे. या सगळ्या अडचणी एन.टी.पी.सी.ला कळवूनही काहीच दखल घेतली गेली नाही. तसेच शेतकर्यांना शासन निर्णयानुसार नुकसानभरपाई दिलेली नाही. काही शेतकर्यांना 50 हजार रूपये प्रती टॉवर तर काही शेतकर्यांना 1 ते 2 लाख रूपये दिले गेले आहेत. त्यामुळे टॉवर्सच्या उभारणीसाठी नुकसानभरपाईचे निकष काय, नुकसान भरपाईची रक्कम किती, यासंदर्भात शेतकर्यांमध्ये संभ्रावस्था निर्माण झालेली आहे. ज्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे, त्या प्रमाणात समाधानकारक नुकसान भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात सोलापूर येथे शेतकर्यांनी गेल्या दोन वर्षात आंदोलने केली. अधिकार्यांसोबत चर्चा केली. तडजोड करून नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहिली. मात्र एन.टी.पी.सी.कडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी संतप्त होऊन लॉक डाऊनच्या काळात रात्रीतूनच हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. नारायण चिंचोली, आढीव, गुरसाळे, नेमतवाडी या भागातील 17 टॉवर्स शनिवारी रात्रीतूनच जमीनदोस्त करण्यात आल्याचे रविवारी उघडकीस आले. हे 17 टॉवर्स पुर्णपणे आडवे पाडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते पुन्हा उभा करण्यासाठी एन.टी.पी.सी.ला करोडो रूपयांचे नुकसान झेलावे लागणार आहे. त्याचबरोबर शेतकर्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल अशीही मागणी काही शेतकर्यांनी केली आहे. प्रचंड महाकाय असे टॉवर्स एकाच रात्रीत पाडणे कसे काय शक्य झाले अशी चर्चा सुरू झाली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.