चिंचणीत एक हजार बांबूच्या झाडांची लागवड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
चिंचणी (ता. पंढरपूर) हे गाव यापूर्वी सातारा जिल्ह्यातून विस्थापित झालेले पुनर्वसीत गाव म्हणून परिचित होते. त्यानंतर या गावाने तब्बल सहा हजार झाडांची लागवड श्रमदानातून करून त्याचे संगोपन केले. आता आणखी एक हजार बांबूच्या झाडांची लागवड केल्याने भविष्यात चिंचणी हे गाव राज्यात झाडांचे गाव म्हणून नावारूपाला येईल, असे मत माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
चिंचणी (ता. पंढरपूर) येथे एक हजार बांबूच्या झाडांची लागवड, जिल्हा पुनर्वसन विकास निधीतून खोदलेल्या विहिरीचे पाणीपूजन, शाळा खोल्यांचे भूमिपूजन आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आ. सुभाष देशमुख यांनी चिंचणी ग्रामस्थांनी विस्थापित झाल्यानंतर पिराची कुरोलीसारख्या माळावर सातारासारखी पाण्याची परिस्थिती नसतानाही तब्बल श्रमदानातून सहा हजार झाडे लावली. त्याचे संगोपन केले. प्राणी, पक्षी, पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी चालविलेली चळवळीला भविष्यात सोलापूर फाऊंडेशन व राज्य, केंद्र सरकारच्या स्तरावरून लागेल ती मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा पुनर्वसन विभागातून मंजूर झालेल्या निधीतून खोदलेल्या विहिरीच्या पाण्याद्वारे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. शिवाय शाळा दुरूस्तीसाठी पुनर्वसन गावांना निधी मिळत नव्हता. मात्र त्यासाठीही निधी उपलब्ध झाल्याने शाळेची सोय होणार आहे. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी चिंचणी स्मशानभूमीत लागवड केलेल्या झाडांचे कौतुक केले.
यावेळी मुंबई म्हाडाचे अधिक्षक अभियंता सुनील ननवरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, श्रमिक मुक्तीदलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, शशिकांत सावंत, चंद्रकांत पवार, शरद सावंत, नितीन कापसे, अमोल जाधव, सिद्धेश्वर देशमुख, मच्छिंद्र पवार, तुकाराम घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Good activities good knowledge