राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ईगल आय मीडिया

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात 75 विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडी संदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी वनमंत्री संजय राठोड, ‘सह्याद्री देवराई’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.
निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वनविभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’ला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात 75 ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. ‘सह्याद्री वनराई’च्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!