मळोली : ईगल आय मीडिया
अकलूज ( ता. माळशिरस ) येथील ग्रामदैवत श्री अकलाई देवीची यात्रा दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने न करता अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. अकलूजच्या नीरा नदीच्या काठावर असलेले अकलाई देवीचे मंदिर अगदी पुरातन काळातील मंदिर असून मोहिते – पाटील परिवाराने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
या मंदिराच्या सभोवताली निसर्गरम्य परिसर असून डाव्या बाजूने वाहणारी नीरा नदी सर्वांचं लक्ष वेधून घेते. पाठीमागे मजबूत तटबंदी, भक्कम बुरुज असणारा शिवकालीन भुईकोट किल्ला असून या किल्ल्यावर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून या किल्लामध्ये शिवसृष्टीचे खास आकर्षण निर्माण केलेले आहे. दरवर्षी होणारी अकलाई देवीची यात्रा या वर्षी मात्र राष्ट्रीय आपत्ती कोरोना या रोगाने स्थगित झाल्याने भक्तमंडळी व ग्रामस्थ यांच्या जीवाला चटका व हुरहूर लागली आहे. अकलूज शहराच्या वैभवास भर घालणारे हे मंदिर अवश्य सर्वानी बघितलेच पाहिजे अशा स्वरूपाचे आहे. यंदा कोरोनामुळे अकलाई देवीची यात्रा साधेपणाने साजरी केली गेली.