५ लाख नागरिकांना फूड पॅकेट व मास्कचे वाटप, १० हजार बाटल्या रक्त जमा करणार
मुंबई : ईगल आय मीडिया
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुलजी गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस आहे. सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती आणि चीन सीमेवर आपले २० जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुलजी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे कोणताही जाहीर कार्यक्रम न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गरजूंना मदत करून राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा देशातील गरोगरीब जनता, कामगार, कष्टकरी यांच्यावर गंभीर परिणाम होणार आहे. असा इशारा राहुलजी गांधी यांनी सरकारला दिला होता. पण केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने देशभरात कोट्यवधी गरीब लोकांना प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आदरणीय काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाने स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलला. गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु आहे. आदरणीय राहुलजी गांधी यांनीही या संकटाच्या काळात रस्त्यावर उतरून गरीब कष्टकरी जनतेचे दुःख जाणून घेतले व त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. राहुल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू लोकांना मदत करून राहुल गांधी यांच्या भावना व्यक्त करण्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निश्चित केले आहे.
राहुल गांधींच्या वाढदिवसा निमित्त राज्यातील गरिब, गरजू, कामगार, झोपडपट्टीतील नागरिक, असंघटीत कामगार अशा ५ लाख गरजूंना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून फूड पॅकेट्सचे वाटप केले जाणार आहे. जेवणाची पंगत न घालता लोकांच्या घरी जाऊन या पॅकेटचे वाटप केले जाणार आहे. यासोबतच गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या किटचेही वाटप करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिरांचे आयोजन
कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवठा निर्माण होऊ नये म्हणून राज्यभरात रक्तदान शिबिरे आयोजित करून १० हजार पिशव्या रक्त जमा करण्यात येणार आहे.
कोरोना वॉरियर्सचा सन्मान
गेली ३ महिने अव्याहतपणे लोकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार असून पोलिसांना रेनकोट, डॉक्टर, नर्सेस यांना PPE कीट, सॅनिटायझर वाटप केले जाणार आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना इम्युनिटी बुस्टर, मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप तसेच सेवाभावी संस्थांना अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू देण्यात येणार आहेत.
तसेच राज्यभरात महिला बचत गटांनी तयार केलेल्या पाच लाख मास्कचे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व अटी, नियमांचे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करून राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गरजूंना मदत करावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी केले आहे.