तब्बल 80 रुग्णांचा आज झाला मृत्यू
टीम : ईगल आय मीडिया
आज दिवसभरातील रुग्णवाढीचा आकडा चिंतेत भर टाकणार आहे. आज दिवसभरात तब्बल ८ हजार ८०७ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 24 तासात 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५१ इतकी होती. मंगळवारी ही संख्या ६ हजार २१८ इतकी होती. हा फरक २ हजार ५८९ इतका आहे. तर आज केवळ २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ०८ हजार ६२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के इतके झाले आहे.
तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २१ हजार ११९ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.३६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २ हजार ४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.