‘पशुवैद्यक विश्वातील विश्वास’ हे पशुवैद्यकीय क्षेत्राशी निगडित पुस्तकाचे प्रकाशन
पंढरपूर : eagle eye news
‘माणूस आपल्या वेदना बोलून सांगतो व त्यावर डॉक्टर उपचार करतात. परंतु, पशुपक्षी आपल्या वेदना बोलून सांगू शकत नाहीत. त्यांच्या वेदना जाणून घेऊन त्या दूर करण्याचे कौशल्य पशुवैद्यकाकडे असते. म्हणूनच पशुवैद्य हा त्या प्राण्यांच्या आत्म्याशी एकरूप होणारा सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहे. डॉ. विश्वास मोरे यांच्या पुस्तकात त्यांचे पशुवैद्य म्हणून नोकरीतील अनुभव, कौटुंबिक नातेसंबंध आणि मित्र व समाजाशी असलेले त्यांचे नातेसंबंध अतिशय हृद्य रीतीने प्रकट झाले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांनी काढले.
सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ, विश्वास मोरे लिखित ‘पशुवैद्यक विश्वातील विश्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. दास यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. समारंभाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक आणि मनोरमा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे हे होते. यावेळी प्रा. डॉ. बी पी रोंगे आदींसह मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी बोलताना श्रीकांत मोरे म्हणाले कि, प्राण्यांविषयी सहसंवेदना आणि माणुसकीचे सार डॉ. मोरे यांच्या पुस्तकात व्यक्त झाले आहे. कुटुंब, समाजसेवा आणि प्राणिसेवा यांचे वर्णन करताना पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा प्रत्यय डॉ. मोरे यांचे पुस्तक वाचताना येतो.
या प्रसंगी लेखक डॉ. विश्वासराव मोरे, भागवताचार्य बाळासाहेब बडवे, ‘पशुवैद्यक विश्वातील विश्वास’ या पुस्तकाच्या संपादक राधिका कुलकर्णी, प्रा. ज्ञानेश्वर जाधव आणि शोभाताई मारे यांनी मनोगते व्यक्त केली. साहित्य परिषदेचे प्रतिनिधी कल्याण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘दुर्वांकुर उत्स्फूर्त काव्य संमेलन’ झाले. त्यात सांगलीचे धनाजी पाटील, पुण्याचे डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, प्रा. अडगळे, आकाश फाटे, उज्ज्वला शिंदे आदींनी कविता सादर केल्या.
प्रकाशन समारंभाला प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, मोहोळचे माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, मोहोळ अर्बन बँकेचे चेअरमन संगीता फाटे व नाना फाटे, औदुंबर वाडदेकर आणि पशुवैद्यक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश बनसोडे यांनी केले, तर प्रा. वृणाल मोरे यांनी आभार मानले.