कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झाली बाजारात हजार गाढवांची विक्री
टीम : ईगल आय मीडिया
श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाची पौष पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली, मात्र दरवर्षीप्रमाणे पौर्णिमा यात्रेनिमित्ताने भरणारा पारंपरिक गाढव बाजार भरला होता. त्यात हजाराच्या आसपास गाढवांची विक्री झाली. मात्र, कोरोना मुळे या गाढव बाजारावर यंदा मंदीचे सावट जाणवले.
बाजारात विक्रीसाठी गाढवे मोठ्या प्रमाणात आली, परंतु खरेदीसाठी व्यापारी कमी आल्याने आर्थिक उलाढाल कमी झाली. गावठी गाढवांना १० ते २० हजार रुपये तर काठेवाडी गाढवांना २० ते ५५ हजार रुपये भाव मिळाला. गुजरातहून आलेल्या १०० काठेवाडी गाढवांची या वेळी विक्री झाली.
गेल्या चार दिवसांपासून येथील बंगाली पटांगणामध्ये गाढव बाजार भरला होता. या वेळी एक हजार गाढवांची खरेदी-विक्री होऊन दीड ते दोन कोटींची उलाढाल झाली. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र आदी राज्यातून व्यापारी आले होते. यामध्ये प्रामुख्याने वैदू, बेलदार, कैकाडी, माती वडार, गारुडी, मदारी, कुंभार आदी समाज बांधवांचा समावेश होता. सातारा, कराड, नगर, पुणे, सांगली, इंदापूर, बारामती, फलटण आदी भागातून अनेक व्यावसायिक गाढवे खरेदीसाठी आले होते.