आ. भालके यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर येथील कोरोना रुग्णांची संख्या 500 कडे निघालेली आहे, त्याचबरोबर पंढरपूर विभागात कोरोनाग्रस्त भागातून येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ही बाब लक्ष्यात घेऊन पंढरपूर येथे swab तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी आ. भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान त्याचवेळी ना पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनवर बोलून प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशीही सूचना केली आहे.
पंढरपूर हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून पंढरपूर परिसरातील लोकसंख्या पाहता या भागात कोरोना तपासणी प्रयोगशाळा आवश्यक असल्याची मागणी करणारे पत्र भालके यांनी ना पवार यांना बुधवारी दिले.
त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पंढरपूर येथे कोविड हॉस्पिटल, कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल, डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू करावे, त्या संदर्भात आवश्यक ती पायाभूत सुविधा तातडीने निर्माण केली जावी. येथील सामान्य रुग्णालय, आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न व्हावेत, शेतकऱ्यांना ग्रामीण भागात बी, बियाणे, खते पुरवठा केला जावा, पंढरपूर विभागात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे सुविधा मिळावी अशाही मागण्या भालके यांनी केल्या आहेत.
दरम्यान, ना अजित पवार यांनी त्याच वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून पंढरपूर येथे प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर येथेच कोरोना तपासणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.