पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन
पंढरपूर : ईगल मीडिया
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीत काही नागरिक परराज्यातून व परजिल्ह्यातून आले आहेत. परंतु स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही. अथवा प्राथमिक तपासणी करुन घेतली नाही. अशा व्यक्तींची माहिती नजीकच्या व्यक्तीने प्रशासनास द्यावी, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सांगोला येथील नगरपालिका हॉल येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीस आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार गणपतराव देशमुख, दिपकआबा सांळुखे-पाटील, पंचायत समितीच्या सभापती राणीबाई कोळवले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांतधिकारी उदयसिंह भोसले, तहसिलदार योगेश खरमाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा दोडामणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, सांगोला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरीक नोकरी निमित्त मुंबई, पुणे येथे स्थायिक झाले आहेत. लॉकडाऊन मुळे कामानिमित्त बाहेर गेलेले नागरीक गावाकडे येत आहेत. सांगोला तालुक्यात घेरडी गावात आलेला रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यांच्या संपर्कातील 20 व्यक्तींना जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. प्रशासनाकडून घेरडी गावात आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
सांगोला तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता प्रशासनाबरोबरच नागरिकांनी घ्यावी. तसेच कोरोनावर मात करणसाठी घेरडी गावात ‘बारामती पॅटर्न्’ राबवावा. तालुक्यातील खासगी वैद्यकीय सुविधा सुरु ठेवाव्यात. तसेच घेरडी जीवनाश्यक सुविधा सुरळीत यांची दक्षता घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिल्या. तत्पुर्वी पालकमंत्री भरणे यांनी घेरडी गावात भेट देवून पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सांगोला तालुक्यातील नागरिक मोठ्याप्रमाणात कामानिमित्त मुबई येथे आहेत. दिनांक 3 मे नंतर मोठ्या प्रमाणात नागरीक सांगोल्यात येण्याची शक्यता असल्याने त्याबाबत प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करवयात तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन दयावी अशी मागणी यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. तसेच माजी आमदार गणपतराव देशमुख घेरडी गावात जीवनाश्यक वस्तू, दुग्ध व्यवसाय, याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आवश्यक सूचनाही माजी आमदार दिपक आबा सांळुखे पाटील यांनी यावेळी मांडल्या.