स्वेरीत कै. राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
‘शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना अनेक महान व्यक्तींचा संपर्क आला. असेच एक साधे, सरळमार्गी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजाबापू पाटील होत, त्यांचे मागील आठवड्यात निधन झाले. कै.राजूबापू पाटील समाजातील अनेकांचे आधारस्तंभ होते. यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापतीपद भूषवले असून तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर त्यांचे एक विशेष मानाचे स्थान होते. त्यांचे कार्य प्रभावी, कणखर आणि प्रामाणिक असे होते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.
सहकार क्षेत्रातील व राजकीय व्यक्तिमत्व असलेले भोसे (ता. पंढरपूर) येथील राजूबापू पाटील यांचे अकस्मात निधन झाल्याने त्यांना स्वेरी परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रथम आदरणीय कै. राजाबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की ‘स्वेरीच्या वाटचालीत कै. राजूबापू पाटील हे एक साक्षीदार राहिले. त्या भागातील अनेक विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवत असताना सतत संपर्क व्हायचा.’ यावेळी स्वेरीचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, संस्थेंअंतर्गत इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.