जनगणनेत आम्ही लिंगायतच लिहीणार : अ‍ॅड.हैबतपुरे


‘ विरशैव लिंगायत हिंदूच ‘ हा सनातन्यांचा डाव असल्याचा आरोप


सोलापूर : ईगल आय मीडिया

लिंगायत समाज आता सजग झाला आहे. त्यातही तरूण पिढीमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्माबाबत जागृती निर्माण होत असल्याने मूठभर सनातन्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करतानांच लिंगायत हा एक स्वतंत्र आणि परिवर्तनवादी धर्म आहे. त्यामुळे आगामी जनगणनेत आम्ही आमचा लिंगायत म्हणूनच नोंद करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.शिवानंद हैबतपुरे यांनी केले.


रविवारी येथील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रा.धम्मपाल माशाळकर आणि ज्योतिर्लिंग स्वामी उपस्थित होते.


हिंदुस्थानात राहणारे सारेच हिंदु
हिंदु ही भौगोलिकता- प्रादेशिकता दर्शविणारी संकल्पना आहे. हिंदुस्थानात राहणारे आपण सारेच हिंदु आहोत. जैन आणि शिख यांना स्वतंत्र धर्म आणि संविधानिक मान्यता असली तरी त्यांचा उल्लेख सरसकट हिंदु म्हणूनच केला जातो. त्याच अनुषंगाने आम्हाला हिंदु म्हटलं जात. परंतु आमचा धर्म लिंगायत आहे. त्याच्या संविधानीक मान्यतेसाठी आमचा लढा सुरू आहे. विरशैव नावाची शेपटी आम्हाला मान्य नाही. आम्ही पिढ्यान पिढ्या संघर्ष करू. आमचा हक्क मिळवूच. आम्ही कोण आहोत हे इतरांनी सांगण्याची अथवा ठरविण्याची गरज अजिबात नसल्याचे अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी सांगितले.


लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनास विरोध करणारी मंडळी अगदी काल परवा पर्यंत ’विरशैव लिंगायत’ असे धर्माचे नाव असल्याचे सांगत होते. आता नव्याने काही मूठभर मंडळी ’विरशैव लिंगायत हिंदूच’ असल्याचे सांगत आहेत. लिंगायत समाजाची दिशाभूल करण्याचा हा सनातन्यांचा डाव आहे. आणि हा डाव कदापी यशस्वी होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा बसवण्णा हे धर्मसंस्थापक आणि वचन ग्रंथ हेच लिंगायतांचे धर्म ग्रंथ असल्याचे अ‍ॅड.हैबतपुरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. माळी, कोष्टी, वाणी, सुतार, बडीगेर, हडपद यासारख्या लिंगायतांच्या पोटजातींनी लिंगायत धर्म मान्यता आंदोलनात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी गावोगावी जनजागरण करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!