पंढरपूर : ईगल आय मीडिया
लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अजूनही उद्योग,व्यापार, व्यवसाय ठप्प आहे. अशा संकट काळात सर्वसामान्य लोकांना मदतीची गरज आहे. परंतु मदत करण्याऐवजी राज्यभरातील गृह निर्माण संस्थांनी देखभाल शुल्कावर व्याज आकारणी करुन सभासदांकडून पठाणी पध्दतीने वसुली सुरु केली आहे. गृहनिर्माण संस्थांच्या तुघलकी निर्णयाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मनसेने याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. संस्थांनी शुल्कावर व्याजाची आकारणी नये,अन्यथा मनसेच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जाईल असा इशारा प्रदेश सरचिटणीस तथा मनसेचे शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.
राज्यात जवळपास 60 टक्क्याहून अधिक भागात नागरिकरण झाले आहे. सर्वच छोट्यामोठ्या शहरांमध्ये व नागरि वस्त्यांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जाळे पसरले आहे.
राज्यात जवळपास 1 लाख 7 हजार 372 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्थांमध्ये 30 लाख 43 हजार सभासद आहेत. गृहनिर्माण संस्थांकडून प्रत्येक सभासदांना देखभाल शुल्क आकारले जाते.
गेल्या चार महिन्यांपासून राज्यभरात कोरोनाचे साथ सुरु आहे. त्यामुळे व्यापार, उ्द्योग, व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या रोजरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थीमध्ये अनेक लोकांकडे देखभाल शुल्काची रक्कम थकली आहे. त्या थकीत शुल्कावर आता या संस्थांनी व्याजाची आकारण केली आहे.
व्याजासह थकीत रक्कम वुसलीसाठी संस्थांनी सभासदांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसेचे शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी व्याज आकारणीस आणि सक्तीच्या वसुलीस विरोध दर्शवला आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही त्यांनी लेखी निवेदन देवून याप्रश्नी लक्ष घालून तातडीने सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. यावेळी मनसेचे सचिव प्रमोद पाटील, सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे,सहकार सेनेचे कोषाध्यक्ष वल्लभ चितळे,उपाध्यक्ष कौस्तुभ लिमये आदी उपस्थित होते.