टीम : ईगल आय मीडिया
सिक्कीम येथे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमधील हवालदार सुजित नवनाथ किर्दत (वय ३७, मूळ रा.चिंचणेर निंब ता. सातारा) हे जवान हुतात्मा झाले. रविवारी सिक्कीम येथील दुर्घटनेत चीनच्या सीमेवर त्यांचा मृत्यु झाला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सुजित किर्दत हे भारतीय सैन्य दलाच्या १०६ बॉम्बे अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक सिक्कीम येथे होती. रविवारी दुपारी किर्दत हे सहकाऱ्यांसमवेत गस्तीवर होते. गस्तीदरम्यान त्यांचे वाहन खोल दरीत कोसळले. यात किर्दत यांच्यासह त्यांचे सहकारी जवान हुतात्मा झाले. अपघातानंतर लष्करी जवानांनी मदत कार्य करत दरीतून हुतात्मा जवानांना बाहेर काढले.
अपघातात सुजित किर्दत हे हुतात्मा झाल्याचे समजताच चिंचणेर निंबसह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली. किर्दत यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी पुणे येथील विमानतळावर येणार आहे. याठिकाणी त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. यानंतर त्यांचे पार्थिव साताऱ्याकडे आणण्यात येणार आहे. किर्दत हे 2002 मध्ये लष्कराच्या अभियंता रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. दीड महिन्यांपूर्वी सुट्टी संपवून ते पुन्हा सेवेत दाखल झाले होते.
जवान किर्दत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी तसेच वडील असा परिवार आहे. जवान सुजित यांचे वडील नवनाथ हे सैन्यातून सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. तर थोरला भाऊ बाम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत आहे.