टीम : ईगल आय मीडिया
जालना शहरालगत असलेल्या घाणेवाडी तलावाच्या पाण्यात बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी काकाने उडी घेतली मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी (३ ऑगस्ट रोजी ) ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. परमेश्वर भानुदास खंडागळे(५०) व रोहित कृष्णा खंडागळे (१८, दोघे रा. मांडवा), अशी मृतांची नावेआहेत.
जालना जवळील घाणेवाडी तलावाच्या बाजूने रोहित खंडागळे हा गुरे चारत होता. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असूनवरील बाजूने गाळ उपसा झाल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. गुरे चारत असताना तलावाच्या काठावर असलेल्या रोहितचा पाय घसरून तो पाण्यात पडला. रोहित पाण्यात बुडत असताना सोबतच्या मुलांनी आरडाओरडा करत आजूबाजूला मदत मागितली.
मुलांचा आवाज ऐकून जवळच शेतात काम करत असलेले रोहितचे काका परमेश्वर खंडाळे हे धावत घटनास्थळी आले. त्यानी रोहितला वाचवण्यासाठी तलावात उडी टाकली मात्र घाबरलेल्या रोहितने परेश्वर बनसोडे यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. यामुळे परमेश्वर यांना कोणतीही हालचाल करता आली नाही व दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.