धडक देऊन एस टी बस गेली भरधाव
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ( ता.पंढरपूर ) येथे एका दुचाकी स्वारास धडक देऊन एस टी बस निघून गेली. धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे.
पालखी मार्गावर वाखरी येथे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामावर निघालेल्या दुचाकी स्वार राजू माने ( वय 52 वर्षे, रा. वाखरी ) यास रामचंद्र पोरे यांच्या घराजवळ आले असता पंढरपूर कडून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बस ( क्र. एम. एच. 13, 5992 ) ने मागून धडक दिली आणि बस भरधाव निघून गेली.
धडक दिल्यानंतर उडालेली मोटार सायकल रस्त्याच्या बाजूला खेळत असलेल्या श्रावणी मच्छिंद्र पोरे ( वय 7 वर्षे ) या मुलीच्या अंगावरून उडून गेली,यामध्ये मुलीच्या डोक्याला मार लागून तीसुद्धा जखमी झाली आहे.
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या माने यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी एस टी बसचा क्रमांक घेतला असून पोलिसांना या संदर्भात कळवण्यात आले आहे.
नको म्हणत असताना ही कामासाठी गेले ! मयत राजू माने याना त्यांच्या पत्नीने आज कामावर जाऊ नका असा सकाळी आग्रह धरला होता. तरीही राजू माने कामावर जाण्यासाठी निघाले होते आणि अपघात झाला. अपघात स्थळी आलेल्या नातेवाइकांनी आक्रोश केला.
दरम्यान, एस टी बस निघून गेल्याचे पाहताच नागरिकांनी ग्रामीण पोलीस पंढरपूर बस आगारात कळवले. त्यानंतर पंढरपूर बस आगर व्यवस्थापनाने संपर्क साधून सदर बस फलटण बस स्थानकातुन पंढरपूर ला परत बोलावली आहे. पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार चालक दोषी असेल तर कारवाई होईल अशी माहिती डेपो मॅनेजर सुधीर सुतार यांनी दिली.