पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू नये तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी कोरोना बरोबरच इतर आजारांसाठी जेष्ठ नागरिकांची प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याबाबत भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
श्री. ढोले म्हणाले, तालुक्यातील सर्व गावांमध्ये तसेच तसेच शहरातील सर्व ठिकाणी घरोघरी जावून 60 वर्षावरील जेष्ठ नागरीक, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिन्याखालील बालके तसेच कॅन्सर, दमा, ह्दयविकार, रक्तदाब, मधुमेह, आदी आजार असणाऱ्या 62 हजार 682 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत त्यांची वेळोवेळी तपासणी व उपचार केले जाणार आहेत. मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही श्री ढोले यांनी सांगितले.
जेष्ठ नारिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी समारंभास जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, सकस व पोषक आहार घ्यावा याबाबत पथकाकडून समुपदेशन व कोरोना आजाराबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच कुटूबांतील ज्या वृध्दांनी आपले जीवन घडविण्यात आपले आयुष्य घालवले त्यांना जपण्याची वेळ आपल्यावर आली असून, प्रत्येकाने घरांतील वृध्दांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.